भीमा-कोरेगावच्या निषेधाची भित्तीपत्रे हस्तगत

तेलंगणा सरकारने इनाम जाहीर केलेला माओवादी अजय दोसरी उर्फ वेणुगोपालसह एकूण सात आरोपींच्या गेल्या काही महिन्यातील हालचालींबाबत राज्य दहशतवाद विरोधी पथक माहिती घेत आहे. विश्वसनीय सूत्रांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार अटकेत असलेल्यांपैकी तिघांकडून भीमा-कोरेगाव दंगलीचा निषेध करणारी भित्तीचित्रे आणि नक्षलवादी विचारसरणीशी संबंधीत  साहित्य हस्तगत करण्यात आले.

महाराष्ट्र-गुजरातेतील औद्योगिक वसाहतींमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया(माओवादी) या संघटनेची विचारसरणी भिनवून पाया भक्कम करणे, नव्या तरूणांना संघटनेत सहभागी करून घेणे आणि संघटनेच्या गैरकृत्यांसाठी आवश्यक असलेली आर्थिक रसद पुरवणे ही मुख्य जबाबदारी वेणुगोपालवर होती, असे समजते. वेणुगोपाल मुंबईच्या घाटकोपर, विक्रोळीतील सहकाऱ्यांना भेटण्यासाठी येणार, ही माहिती एटीएस अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला कल्याण रेल्वे स्थानकात अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून माहिती घेत घाटकोपर, विक्रोळीतील सहा तरूणांनाही गजांआड केले गेले.

भिमा कोरेगाव दंगलीचे मुंबईसह राज्यात तीव्र पडसाद उमटले. मुंबईच्या विक्रोळी, चेंबूर, पवई भागात आंदोलकांनी बरीच तोडफोड केली. पोलिसांच्या निरीक्षणानुसार अन्य भागातून आलेल्या आंदोलकांकडून तोडफोड, जाळपोळीच्या घटना जास्त घडल्या. त्यामुळे एटीएसने अटक केलेल्या आरोपींनी दंगलीचे निमित्त साधून मुंबईतील तरूणांची माथी भडकावली का, चिथवून त्यांना रस्त्यावर उतरवले का याबाबत चौकशी सुरू आहे. वेणुगोपालसोबत अटक करण्यात आलेले सहा तरूण मुळचे तेलंगणाचे रहिवासी असले तरी सध्या घाटकोपर, विक्रोळी आणि ठाण्यात वास्तव्यास होते. ते मुंबईत कधी आले, काय करतात, त्यांचा मित्रपरिवार कोण, यासोबत संघटनेचा पाया भक्कम करण्यासाठी हे आरोपी कधीपासून सक्रिय आहेत, आतापर्यंत त्यांनी मुंबईतील किती तरूणांना आपल्या संघटनेत सहभागी करून घेतले, त्यांचे अर्थार्जनाचे स्त्रोत यामुद्यांवर एटीएसकडून कसून चौकशी सुरू असल्याचे समजते.

वेणुगोपालवर आठ लाखांचे इनाम

आरोपींच्या मोबाईल, समाजमाध्यमांवरील हालचालींची तपासणी सुरू आहे. एटीएसमधून मिळालेल्या माहितीनुसार वेणुगोपालवर तेलंगणा सरकारने आठ लाखांचे इनाम जाहीर केले होते. गेल्या वीस वर्षांपासून त्याचा शोध सुरू होता.