News Flash

पूरग्रस्तांच्या मुद्द्यांवर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून ‘स्वाभिमानी’ च्या शिष्टमंडळाला मिळालं ‘हे’ आश्वासन!

पूरबाधींतांना नुकसान भरपाई व त्यांचे पुनर्वसन याबाबत राजू शेट्टी आणि खासदार धैर्यशील माने यांनी बैठकीत मुद्दे मांडले होते.

पूरग्रस्तांच्या मुद्द्यांवर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून ‘स्वाभिमानी’ च्या शिष्टमंडळाला मिळालं ‘हे’ आश्वासन!

“राज्यात अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय यापुर्वीच घेतला आहे. त्यांची अमंलबजावणी तसेच केंद्र शासनाकडून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या एनडीआरएफच्या मदत निकषात वाढ करण्यात यावी यासाठी विविध पातळ्यांवरून पाठपुरावा सुरु आहे. याशिवाय पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये. त्याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतही तज्ज्ञांशी आणि यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत आहे.” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. याचबरोबर, पूरग्रस्त शेतकरी, बाधितांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासमवेत बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अनिल देसाई, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.

बैठकीत पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात निर्माण झालेली पूरस्थिती, पूरबाधींतांना नुकसान भरपाई व त्यांचे पुनर्वसन याबाबत राजू शेट्टी तसेच खासदार धैर्यशील माने यांनी मांडणी केली.

पूरग्रस्तांचं विनाअट पुनर्वसन करा; महापुरामध्ये बुडालेल्या पिकांवरील कर्ज माफ करा – राजू शेट्टी

यावर मुख्यमंत्री म्हणाले, “सन २०१९ या वर्षी शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने जी मदत केली आहे. त्याच धर्तीवर आताही मदत करण्यात येईल. जुलै महिन्याच्या सुरूवातीला राज्यात पडलेला अचानक पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात करोनाच्या संकटाबरोबरच नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ होत आहे. जुलै महिन्यात कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस त्याचबरोबर मराठवाडा, खान्देश व विदर्भ या परिसरातही मोठयाप्रमाणात पाऊस पडत आहे, त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळोवेळी येणाऱ्या आपत्तीत लोकांचे होणारे नुकसान पाहून आपतग्रस्तांना देण्यात येणारी तत्काळ मदत शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिकची मदत दिली आहे. ”

पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत रिझर्व्ह बँकेशी चर्चा करण्यात येणार –

तसेच, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “जुलै महिन्यातील अचानक आलेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिकांसाठी काढलेली पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत रिझर्व्ह बँकेशी याबाबत चर्चा करण्यात येईल. रोजगार हमीच्या माध्यमातून या भागात कामांना प्राधान्य देखील देण्यात येईल. पूर कालावधीत वाढणारे बॅक वॉटर यामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक, तसेच आंध्रप्रदेश बरोबर देखील याबाबतीत संवाद समन्वय साधला आहे. धरणातील बॅक वॉटर बाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या उपाययोजना सुरू आहेत.” तसचे, पूरबाधीत क्षेत्रातील लोकांचे योग्यरित्या पुनर्वसन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पुनर्वसन धोरणांबाबत सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

यावेळी झालेल्या चर्चेत माजी खासदार राजू शेट्टी, खासदार धैर्यशील माने यांच्यासह शिष्टमंडळातील सदस्यांनी पूरबाधीत शेतकरी व जनतेच्या समस्यांची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2021 8:56 pm

Web Title: swabhimanis delegation received assurance from the chief minister in the meeting held on the issues of flood victims msr 87
Next Stories
1 मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील कांदळवनावर असणार आता “सीसीटीव्ही”ची नजर!
2 पूरग्रस्तांचं विनाअट पुनर्वसन करा; महापुरामध्ये बुडालेल्या पिकांवरील कर्ज माफ करा – राजू शेट्टी
3 मुंबईकर महिलेने टाटा मेमोरियल रुग्णालयाला दान केली तब्बल १२० कोटींची जमीन
Just Now!
X