मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या दुरुस्ती कामामुळे ऐरोली आणि आनंदनगर येथील टोलनाक्यांवर देण्यात आलेली सवलत बंद होताच सोमवारी सकाळपासून या मार्गावर वाहतूक कोंडी झाली.

मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक ठाणे, नवी मुंबई, कल्याण तसेच भिवंडी शहरातून वळविण्यात आली होती. आधीच गर्दीच्या वेळेत ऐरोली आणि आनंदनगर पथकर नाक्यावर वाहतूक कोंडी होत असतानाच त्यात अवजड वाहनांची मोठी भर पडली होती. शेवटी सरकारने या दोन्ही टोलनाक्यांवर खासगी वाहनांना गणेशोत्सवापर्यंत पथकरातून सूट दिली होती. मात्र, ही मुदत रविवारी मध्यरात्री संपली असून सोमवारी या मार्गांवर पुन्हा टोलवसुलीला सुरूवात झाली. टोल वसुली सुरू होताच या मार्गांवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली.

चार महिन्यांच्या दुरुस्ती कामानंतर मुंब्रा बाह्य़वळण मार्गही दहा दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. असे असले तरी दोन्ही नाक्यावरून सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाच्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत पथकर वसुलीमुळे या नाक्यावर कोंडी झाली.

दरम्यान, आम्हाला कायमची टोलमुक्ती हवी आहे. वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.