पनवेल येथील घोटगाव जवळील नदीच्या पुलावरुन जात असलेली कार पुलावरील रस्ता समजून वळण घेताना थेट नदीच्या पात्रात पडल्याची घटना घडली आहे. दरम्यान, कारमधून प्रवास करणारे कुटुंब कारच्या टपावर चढून मदतीसाठी ओरडत होते. त्यावेळी स्थानिकांनी त्यांना दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या पात्रातून सुखरुप बाहेर काढले.

पोलिसांच्या माहितीनुसार, अशरफ शेख (वय ३७), पत्नी हमीदा (वय ३३), मुलगी सुहाणा (वय ७), पुतणी नमीरा (वय १७) सर्व रा. वावंजे गाव ता. पनवेल जि. रायगड हे कुटुंब सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वावंजे गाव येथून तळोजा फेज-१ येथे जात असताना घोटगाव जवळील नदीच्या पुलावर एका वळणावर त्याच्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार नदी पात्रात पडली व एका खडकामध्ये जाऊन अडकली. कार अडकल्यामुळे पुढील अनर्थ टळला. कारण, दमदार पावसामुळे नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.

मात्र, कार अडकल्याचा फायदा घेत या कुटुंबाने कारमधून बाहेर पडत टपावर चढून मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर स्थानिकांनी नदी किनारी धाव घेत या कुटुंबाला दोरखंडाच्या सहाय्याने नदी पात्रातून बाहेर काढले त्यामुळे त्यांचा जीव वाचू शकला. या मदत कार्यात घोटगावचे ग्रामस्थ नारायण पाटील, लहू पाटील, लक्ष्मण धुमाळ, तुळशीराम निघूकर, रुपेश पाटील यांचा सहभाग होता. कारमधील सर्वांना किरकोळ मार लागला असून त्यांच्यावर प्रथमोपचार करुन घरी पाठवण्यात आले, अशी माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले.