संदीप आचार्य 
मुंबई: करोनाच्या साथीने संपूर्ण जगात आपली दहशत निर्माण केली आहे. लाखो लोकांना आपले प्राण तर गमवावे लागलेच पण अनेक देशांच्या अर्थव्यवस्था व आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर करोनासह साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत जगातील सर्वात मोठे साथरोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच हजार बेडचे हे रुग्णालय मुलुंड येथे उभारण्यात येण्यात असून त्यासाठी लागणारा सर्व निधी मुंबई महापालिकेकडून उभारण्यात येणार आहे.

करोनाचा पहिला रुग्ण मुंबईत आढळला तेव्हा साथरोग आजाराचा सामना करण्यासाठी मुंबईत केवळ कस्तुरबा हेच साथरोग रुग्णालय होते. पुढे करोनाची साथ वेगाने पसरत गेली आणि एकट्या मुंबईत आज करोनाचे एक लाख २४२३ रुग्ण झाले आहेत तर ५८५५ करोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. एकीकडे करोना तर दुसरीकडे पावसाळ्यातील साथीचे आजार असा दुहेरी सामना आगामी काळात करावा लागणार आहे. तसे दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबते. मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस व स्वाईन फ्लूचे रुग्णांवरील उपचार हा एक प्रश्नच असतो. गेल्या काही वर्षात जागतिक आरोग्य संघटनेने एखद्या साथीच्या आजाराबाबत ‘रेड अलर्ट’ चा इशारा दिला की आपली तुटपुंजी आरोग्य यंत्रणा मिळेल तशी धावत सुटते. करोनाचा सामना करतानाही सुरुवातीला आरोग्य यंत्रणांची अवस्था आंधळ्यांच्या शर्यतीसारखी होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या काही महिन्यात विशेष करून राज्यातील साथीचे आजार व उपाययोजना यांचा सखोल आढावा घेतला. अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली.

या सगळ्या चर्चेतून मुंबईत जगातील सर्वात मोठे साथरोग रुग्णालय उभारण्याची योजना आकाराला आली. करोनाची साथ आज जशी आली तशी भविष्यात आणखीही कुठली साथ आलीच तर त्याचा सक्षमपणे सामना करण्यास महाराष्ट्र तयार असला पाहिजे, हा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला असून राज्याचा विचार करता मुंबईत असे सर्वात मोठे साथरोग रुग्णालय उभारणे हे सर्वार्थाने योग्य ठरणारे आहे. यातूनच मुलुंड येथे महापालिकेचे जगातील सर्वात मोठे म्हणजे जवळपास पाच हजार बेडचे साथरोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर याबाबतची संकल्पना आकाराला आली आहे. यात साथरोग आजाराबरोबर मल्टीस्पेशालीटीची तसेच साथरोग संशोधनापासून तज्ज्ञांसाठी व्यासपीठ उभारले जाणार आहे.

जवळपास चार हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प होऊ शकतो असे काही ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. मुंबई महापालिकेचे आरोग्याचा अर्थसंकल्प हा ४२६० कोटी रुपयांचा असून गेल्या वर्षीपेक्षा तो १५ टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या वर्षी पालिकेचे आरोग्याचा अर्थसंकल्प हा ४१५१ कोटींचा होता. आगामी वर्षात पालिकेने गोवंडी शताब्दी रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी ५०२ कोटींची व्यवस्था केली तर मुलुंडच्या एम. टी. अगरवाल रुग्णालयासाठी ४५८ कोटी आणि भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी ५९२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आता आगामी अर्थसंकल्पात मुलुंडच्या पाच हजार बेडच्या साथरोग रुग्णालयासाठी स्वतंत्र तरतूद केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

आवश्यकता लागल्यास राज्यसरकार यासाठी निधी उपलब्ध करून देईल असेही एका उच्चपदस्थ अधिकार्याने सांगितले. याबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना विचारले असता ते म्हणाले, “याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना पक्की आहे. भविष्यात पुन्हा एखादी साथ आली तसेच राज्यातील साथरोगाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी एक स्वतंत्र रुग्णालय असण्याची आवश्यकता लक्षात घेऊनच ही संकल्पना आकाराला आली. जगातल हे सर्वात मोठे साथरोग रुग्णालय असल्याने याचा आराखडा तयार करण्यासाठी जागतिक पातळीवर निविदा मागविण्यात येईल”, असे आयुक्त चहल यांनी सांगितले. या रुग्णालयाबाबत आज काही तज्ज्ञांशी चर्चा केल्याचे सांगून आयुक्त म्हणाले की, हे रुग्णालय नियोजित वेळेत पूर्ण करण्याला आमचे प्राधान्य राहील.

करोनामुळे तारांबळ उडाली

करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागल्यानंतर रुग्णालयात बेड मिळणे तसेच अतिदक्षता विभागातील बेड साठी सुरुवातीला अक्षरश: रुग्णांची फरफट होत होती. यातूनच नायर रुग्णालयाचे संपूर्णपणे करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आले. पाठोपाठ शीव व केईएम रुग्णालयातील करोना बेडची संख्या वाढविण्यात आली. हेही कमी ठरणार असल्याने बीकेसी, महालक्ष्मी, गोरेगाव एनएससी , दहिसर व मुलुंड येथे हजार हजार बेडची तात्पुरती रुग्णालये उभारण्यात आली. यासाठीचा खर्चही अवाढव्य होता. जवळपास ६७० कोटी रुपये खर्च झाल्याचे पालिका सूत्रांचे म्हणणे आहे.

या रकमेत ७०० बेडचे कायमस्वरूपी रुग्णालय उभे राहू शकते. तथापि आगामी काळात सर्व प्रकारच्या साथरोग आजाराचा सामना करता येण्यासाठी तसेच अति विशेष उपचार व संशोधनासाठी सर्वार्थाने उपयुक्त ठरेल असे रुग्णालय असणे ही काळाची गरज असल्याचे लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच हजार बेडचे भव्य साथरोग रुग्णालय उभारण्याचा संकल्प केल्याचे एक उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.