News Flash

पाणथळीवरील ‘पर्यावरण पर्यटना’ची योजना बासनात

राज्यासह मुंबईतील पाणथळ क्षेत्रावरील अतिक्रमणावर लक्ष ठेवण्याचे काम या समितीद्वारे केले जाते.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईत एकाही पाणथळ क्षेत्रावर विकासाकरिता जागा नाही

मुंबई : मुंबई शहरातील पाणथळ क्षेत्र विकास प्रकल्पांच्या विळख्यात अडकल्यामुळे ‘पर्यावरण पर्यटन क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यासाठी येथील एकाही पाणथळ क्षेत्राची क्षमता नसल्याचे समोर आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पाणथळ क्षेत्रातील अतिक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी २०१६ साली एक समिती स्थापन केली होती. या समितीने राज्याच्या सागरी जिल्हय़ातील प्रत्येकी एक पाणथळ जमिनीचा तुकडा ‘पर्यावरण पर्यटन क्षेत्र म्हणून’ घोषित करण्यासाठी प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार आजवर मुंबई उपनगरासह इतर जिल्ह्य़ांनी आपले प्रस्ताव पाठविले असून मुंबई शहरात पाणथळ जमिनींची क्षमता नसल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने २०१२ साली पाणथळ जागांवर अनधिकृत बांधकाम करणे बेकायदेशीर ठरवून पाणथळ जमिनीच्या संवर्धनाकरिता २०१६ साली एका समितीचे गठन केले होते. राज्यासह मुंबईतील पाणथळ क्षेत्रावरील अतिक्रमणावर लक्ष ठेवण्याचे काम या समितीद्वारे केले जाते. या समितीने राज्याच्या सात सागरी जिल्ह्य़ांच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येकी एक पाणथळ जमीन ‘पर्यावरण पयर्टन क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याचे आदेश दिले होते. पाणथळ क्षेत्राचा ‘पर्यटन क्षेत्र’ म्हणून विकास करण्याबरोबरच त्याअनुषंगाने स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून पाणथळीचे महत्त्व नागरिकांना समजून देणे, असा यामागील उद्देश होता. मात्र जागांचा निवडीसाठी काही निकष देण्यात आले होते. त्यानुसार हे क्षेत्र १५ किंवा ६ हेक्टरपेक्षा मोठे असावे आणि त्या ठिकाणी स्थानिक पक्ष्यांसोबत स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास असावा, अशा पद्धतीचे निकष होते.

या निकषांनुसार मुंबई उपनगरामधील गोराई खाडीनजीकचे १९.७ हेक्टरचे क्षेत्र, ठाणे जिल्ह्य़ातील पारसिक रेतीबंदर, रायगड जिल्ह्य़ातील मोर्बे, पालघर जिल्ह्य़ातील पाणजू बेट, रत्नागिरी जिल्ह्य़ातील सोनगावचा परिसर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील पाउशी या जागा त्या-त्या जिल्ह्य़ातील जिल्हाधिकाऱ्यांनी ‘पर्यावरण पर्यटन क्षेत्र’विकासासाठी जाहीर केल्या आहेत.

सातपैकी सहा जिल्ह्य़ांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीचे प्रस्ताव पाठविले असून मुंबई शहरात ‘पर्यावरण पर्यटन क्षेत्र’ विकासासाठी पाणथळ जागांची क्षमता नसल्याची माहिती या समितीचे प्रमुख कोकण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. तसेच या जागांचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी वनविभाग आणि पर्यटन विभागाशी समन्वय साधण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.

..म्हणून पर्यटन क्षेत्रांचा विकास अशक्य

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘नॅशनल  वेटलॅण्ड अ‍ॅटलास, महाराष्ट्र’नुसार मुंबई शहराच्या ६९ चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी ७.६३ चौरस किलोमीटर क्षेत्रावर ६३ पाणथळ क्षेत्रे आहेत. मुंबई शहरात शिवडी, माहूल, ट्राम्बे खाडीनजीक विस्तृत असे पाणथळ क्षेत्र आहे. पर्यावरण पर्यटन क्षेत्र घोषित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व निकषांची पूर्तता करण्याची क्षमता या ठिकाणच्या पाणथळ क्षेत्रामध्ये आहे. हे क्षेत्र १५ हेक्टर पेक्षा मोठे असून फ्लेमिंगो आणि इतर स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास या ठिकाणी आहे. मात्र सध्या या ठिकाणी ट्रान्सहार्बर लिंकच्या कामाने वेग धरला आहे. त्यामुळे या क्षेत्राचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करणे अशक्य असून मुंबई शहरातील पाणथळ क्षेत्रांवर विकास प्रकल्प राबवून त्यांना नष्ट केले जात असल्याचे या समितीचे सदस्य आणि वनशक्ती संस्थेचे संचालक डी.स्टेलिन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 2:57 am

Web Title: there is no place for development in a wetland area in mumbai
Next Stories
1 महात्मा फुले योजनेतून ३५ रुग्णालये बाद
2 गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डय़ांची समस्या निकाली काढणार
3 कचऱ्यासाठी पिशव्यांची खरेदी करताना सावधान
Just Now!
X