सुधींद्र कुलकर्णी त्यांच्यावरील हल्ल्यासाठी शिवसैनिकांना जबाबदार धरत असतील तर माझे शिवसैनिकांना एवढेच सांगणे आहे की, त्यांनी राष्ट्रभक्तीचा अंगार असाच पेटता ठेवला पाहिजे, हीच शिवसेनेची रग आहे, अशी प्रतिक्रिया सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली. सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर करण्यात आलेल्या शाईफेकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कुलकर्णींवरील हल्ला ही तर केवळ सौम्य प्रतिक्रिया असल्याचे म्हटले. सीमेवर पाकिस्तानकडून भारतीय सैनिकांवर हल्ले सुरू असताना कुलकर्णी यांच्यासारख्याकडून पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा घाट घातला जातो. त्यामुळे देशातील जनता संतप्त आहे, त्यांच्या मनात राग आहे. देशातील राष्ट्रवादी जनतेला असले प्रकार पसंत नाहीत. या संतप्त व्यक्तींपैकीच कुणीतरी हे कृत्य केले असावे. लोकांच्या संतापाचा स्फोट कसा आणि कुठे होईल, हे सांगता येत नाही. ही तर केवळ सौम्य आणि सनदशीर प्रतिक्रिया आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाला राज्य सरकारकडून पुरविण्यात आलेल्या सुरक्षेविषयी बोलताना सरकार पाकिस्तानच्या बाजूने आहेत की राष्ट्रभक्तांच्या बाजूने आहेत, असा सवालही राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
तोंडावर शाई उडवली तर एवढे चिडता मग सीमेवर आमच्या सैनिकांचे रक्त पाहून तुम्हाला चीड येत नाही का, तुमच्या तोंडाला काळं फासलं नसून जवानांचे रक्त फासण्यात आले आहे, असेही यावेळी राऊत यांनी म्हटले.
सुधींद्र कुलकर्णींवरील शाईहल्ला आम्ही घडवून आणलेला नाही. मात्र, ते यासाठी शिवसैनिकांनाच जबाबदार धरत असतील तर माझे शिवसैनिकांना एवढेच सांगणे आहे की, त्यांनी राष्ट्रभक्तीचा अंगार असाच पेटता ठेवला पाहिजे, हीच शिवसेनेची रग आहे. भाजपनेही केवळ सत्तेत असल्यामुळे वेगळी भूमिका घेऊ नये, असे सांगत राऊत यांनी फडणवीस सरकारची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला.