प्रथमच संदर्भ पाहण्याची आणि ट्रेसिंग वापराची परवानगी; प्राध्यापकांची हरकत ; विद्यापीठाकडे तक्रार

उपयोजित कला शाखेच्या पदवी परीक्षेच्या चित्रकला आणि माहिती अभिकल्प (इन्फॉर्मेशन डिझाइन) या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत परीक्षेच्या सुरुवातीपासून संदर्भ पाहणे व ट्रेसिंगचा वापर करण्याची परवानगी असल्याचे नमूद केले होते. आजपर्यंत या विषयांच्या परीक्षेत थेट ट्रेसिंग वापरण्याची सूचना नव्हती. मात्र यंदा ही परवानगी दिल्यामुळे विद्यार्थ्यांना एक प्रकारे अनुकरणाची संधीच दिल्याची तक्रार काही प्राध्यापकांनी विद्यापीठाकडे केली आहे. मात्र या तक्रारीबाबत कला क्षेत्रातच दोन नवे मतप्रवाह वाहू लागले आहेत.

तक्रारदाराच्या भूमिकेचे समर्थन करत कला क्षेत्रातील अभ्यासक प्रा. रमेश वडजे यांनी सांगितले की, परीक्षेची ही पद्धत चुकीची असून ही सूचना म्हणजे विद्यार्थ्यांना थेट अनुकरण करण्याची परवानगी दिल्यासारखेच आहे. याचबरोबर विद्यार्थी त्यांना आवश्यक ते संदर्भ पाच तासांच्या परीक्षेच्या दुसऱ्या सत्रात वापरू शकतात. पहिल्या सत्रात ते जे कच्चे काम करतात त्याचा विचारही गुण देताना केला जातो. यामुळे या नव्या नियमांना कोणताही तार्किक आधार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर काळानुरूप अभ्यासक्रमात बदल होत असून आवश्यकतेनुसार ट्रेसिंगचा वापर करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. मात्र सरसकट वापर करणे चुकीचे असल्याचे मत ज्येष्ठ कलाकर व निवृत्त प्राध्यापक नंदकुमार मानकर यांनी व्यक्त केले. परीक्षेच्या कालावधीत सुरुवातीला विद्यार्थ्यांनी रेखाटन करणे, त्यानंतर चित्र तयार करणे अशा शास्त्रशुद्ध पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, प्रश्नपत्रिकेतील ट्रेसिंग संदर्भातील चूक ही अगदी तांत्रिक आहे, अशी चूक होणे अपेक्षित नसल्याचे विषयाचे अधिष्ठाता संतोष क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. पण या चुकीमुळे विद्यार्थ्यांनी अनुकरण केले व चित्र काढले हा युक्तिवाद पटण्याजोगा नाही. विद्यार्थी त्यांची कला त्यांच्या कल्पकतेनुसार आणि सरावानुसारच सादर करू शकतात. यामुळे अशा प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये तांत्रिक चुकांचा बागुलबुवा करून मुंबई विद्यापीठाची आणि कला महाविद्यालयाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही क्षीरसागर यांनी नमूद केले. सध्या जगभरात कलेची परीक्षा कशी घ्यायची यापद्धतीत काळानुरूप कोणते बदल करायचे याबाबत चर्चा सुरू आहेत. हे सर्व होत असताना असे प्रश्न उपस्थित करून समाजाच्या मनात व्यवस्थेविषयी संभ्रम निर्माण करणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

तक्रार काय?

या नियमांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या संदर्भातून थेट अनुकरण करण्यास मुभा मिळते. त्यात त्यांची कल्पकता दिसून येत नसल्याचे तक्रारदार प्राध्यापकाचे म्हणणे आहे. हा प्रकार पूर्णपणे चुकीचा असून विद्यापीठाने याची गंभीर दखल घेत हा गैरप्रकार थांबवावा व प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही तक्रारीत नमूद केले आहे.

झाले काय?

मुंबई विद्यापीठातर्फे उपयोजित कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षांच्या ३१ मार्च रोजी चित्रकला व ७ एप्रिल रोजी माहिती अभिकल्प या विषयांची परीक्षा घेतली. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या सूचनांमध्ये बदल करण्यात आल्याने अनेक शिक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नवीन सूचनांमध्ये विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून संदर्भ पाहणे व थेट ट्रेसिंग वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांना कच्चे चित्रण न करता थेट अंतिम चित्र काढण्यास मुभा देण्यात आली होती. हे दोन्ही नियम आत्तापर्यंतच्या परीक्षा पद्धतीला धरून नसल्याची तक्रार प्राध्यापकांनी परीक्षा नियंत्रकाकडे केली आहे.