13 August 2020

News Flash

शहरबात : उज्ज्वल भविष्याचा खडतर मार्ग

नुकतीच मुंबईत पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था या विषयावर एक कार्यशाळा घेण्यात आली होती.

सुहास जोशी

उज्ज्वल भविष्याचा मार्ग खडतरच असतो, हा वाक्प्रचार वर्षांनुवर्षे आपल्या कानावर पडत आला आहे. पण सध्या मुंबईकरांना कोणत्याही भागातून प्रवास करताना याची पावलोपावली जाणीव होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत मुंबईत सर्वत्र सुरू असलेल्या मेट्रोच्या आणि उड्डाण पुलांच्या कामांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रकाश टाकण्यासाठी ‘लोकसत्ता मुंबई’च्या प्रतिनिधींनी शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर मुंबईकरांच्या घाईगर्दीच्या काळात प्रवास केला. तब्बल ६८ हजार कोटी रुपयांची मेट्रोची कामे मुंबईत सुरू आहेत. उज्ज्वल भविष्यासाठी मुंबईकरांना हा त्रास झेलावा लागत असला तरी हे खरे तर व्यवस्थांच्या दिरंगाईचे फळ आहे. पण ही अवस्था म्हणजे तहान लागल्यावर विहीर आणि तीदेखील पावलोपावली, खोदण्यासारखी आहे.

मुंबईचा विस्तार केवळ एकाच दिशेने होऊ  शकतो. तसा तो मुंबईलगतच्या शहरांमध्ये कैक वर्षांपासून होतच आहे. मात्र त्याचवेळी उपनगरातदेखील वस्ती दाट होत गेली. दुसरीकडे मुंबईतील नोकरी-व्यवसायाची केंद्रे बदलत गेली. सरकारी यंत्रणांनी वांद्रे-कुर्ला संकुल वसवले. त्याशिवाय अनेक नवीन व्यवसाय केंद्रांची निर्मिती गेल्या पंधरा वर्षांत झाली आहे. लोअर परळ, परळ, वरळी या परिसरातील अनेक बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागी टोलेजंग अशा बहुमजली इमारती उभ्या राहिल्या. मुख्यत: सेवा उद्योगाशी निगडीत असणारी ही कार्यालये आणि पर्यायाने हा परिसर गर्दीने ओसंडू लागला. असेच काहीसे चित्र अंधेरी, गोरेगाव परिसरातदेखील दिसून येते. तेथे गिरण्यांच्या जागांऐवजी रिकाम्या जागांचे इतर पर्याय होते. थोडक्यात काय कधी काळी मुंबईत व्यवसाय-नोकरीसाठी येणाऱ्यांचा प्रवास हा उत्तर-दक्षिण असा सरळ एका रेषेत होत होता, तो आता उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम असा उभा-आडवा होऊ  लागला. पण वाहतुकीसंदर्भातील पायाभूत यंत्रणा मात्र केवळ एकाच दिशेचा विचार करत होती. त्यातही रस्त्यांसाठी जागेची कमतरता असल्यामुळे या विचारावरदेखील मर्यादाच होत्या. आत्ता मुंबईत सर्वत्र सुरू असलेल्या मेट्रोच्या सहा प्रकल्पांची योजना बरीच जुनी आहे. पण त्याची अंमलबजावणी योग्य वेळी झाली नाही.

परिणामी आज सर्वत्र एकाच वेळी पायाभूत सुविधांच्या कामांची गर्दी दिसून येते. अर्थातच रस्तोरस्ती वाहतूक कोंडी झाली नाही तरच नवल वाटू शकेल अशी परिस्थिती आहे. सध्या सुरू असणाऱ्या मेट्रोच्या चार मार्गिकांमुळे उपनगरी रेल्वे मार्गाला आणि काही प्रमाणात द्रुतगती मार्गांना थेट पर्याय निर्माण होईल. मात्र मुंबईच्या पूर्व-पश्चिम वाहतुकीला ठोस पर्याय स्वामी समर्थनगर ते विक्रोळी आणि डीएन नगर ते मानखुर्द या दोन मेट्रो मार्गांमुळेच मिळेल. उत्तर-दक्षिण वाहतुकीला मिळणारा मेट्रोचा पर्याय हादेखील सध्या केवळ मुंबईच्या सीमांपुरताच म्हणजे पूर्व उपनगरात मुलुंड आणि पश्चिम उपनगरात दहिसरपर्यंतच मर्यादित आहे. मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या भविष्यातील योजनांमध्ये उपनगरांच्या पलीकडे मेट्रोचे जाळे विस्तारण्याच्या अनेक योजना आहेत. त्यानुसार पुढील आठ-दहा वर्षांत मुंबई, उपगनगर, त्यापलीकडचा प्रदेश असे मिळून ३०० किमी मेट्रोचे जाळे निर्माण होणार आहे. पण त्यासाठी बरीच वाट पाहावी लागेल.

दुसरीकडे शहरातील रस्त्यांची मर्यादा वारंवार उघडी पडताना दिसते. पश्चिम उपनगरातील लिंक रोड हा अंतर्गत भागातील अतिवर्दळीचा रस्ता आहे. पण या रस्त्याच्या क्षमतेपेक्षा येथे वाहनांची संख्या अधिक असल्याचे अधिकारी सांगतात. हाच प्रकार कमी अधिक फरकाने पश्चिम द्रुतगती मार्ग आणि एलबीएस मार्गाबाबतदेखील दिसून येतो. पूर्व पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मार्गांमध्ये मेट्रोने फारशी भर पडणार नसली तरी सध्या उपलब्ध असणाऱ्या रस्त्यांवर ठोस तोडगा काढावा लागेल. पण तशी यंत्रणांची इच्छाशक्ती दिसत नाही. चेंबूर सांताक्रूझ लिंक रोडचे काम मोठा गाजावाजा करून साजरे करण्यात आले होते. मात्र या रस्त्याचा जो भाग खुला झाला ते दुसऱ्या टप्प्याचे काम होते. पहिल्या टप्प्याचे काम कुर्ला बस आगारापासून ते सांताक्रूझपर्यंतचे आहे. दोन वर्षांंपासून ते काम सुरूच आहे. हा पायाभूत यंत्रणांचा हलगर्जीपणाच म्हणावा लागेल. दोन्ही द्रुतगती मार्गावरून शहरात प्रवेश केल्यानंतर पूर्व-पश्चिम प्रवास करण्यासाठी मात्र पुन्हा रस्त्यांची कमतरता दिसून येते. दादर, परळ, लोअर परळ या भागांतील रस्त्यांची रुंदी गेल्या काही वर्षांत एक मीटरनेदेखील वाढलेली नाही. उलट सध्या महापालिकेने येथील एक पूल पाडल्यानंतर वाहतुकीचा बोजवाराच उडाला आहे. या ठिकाणी उज्ज्वल भविष्यासाठी काय होणार आहे याची चर्चा कोठेच होताना दिसत नाही. मोनो रेल्वेची मार्गिका या परिसरातून जाते. पण द्रुतगती मार्गावरून अथवा उपनगरी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोनो मार्गिकेचा अजिबात उपयोग होत नाही. थोडक्यात मोनो म्हणजे पांढरा हत्तीच झाला आहे. दुसरीकडे शहराच्या वेशीवरील ठाणे ते बोरिवली या दिवसागणिक वाहतूक वाढणाऱ्या मार्गावर अजूनही पर्याय काढलेला नाही. भविष्याकडे पाहताना शहराच्या पलीकडे जाऊनदेखील विचार करावा लागणार आहे.

या सर्वामध्ये पुन्हा पर्यावरणाचा मुद्दा डोके वर काढत असतो. हजारोंच्या संख्येन तोडावी लागणारी झाडे आणि त्याबाबतचा पायाभूत यंत्रणांचा दृष्टिकोन यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमींनी मोठा आवाज उठवला. सध्या हे प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही. पण उज्ज्वल भविष्याचा विचार करताना त्यात पर्यावरणाचा विचारदेखील तितकाच महत्त्वाचा आहे याची जाणीव सर्वच यंत्रणांना ठेवावी लागेल.

नुकतीच मुंबईत पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था या विषयावर एक कार्यशाळा घेण्यात आली होती. पर्यावरणपूरक म्हणून मेट्रो, विजेवर धावणाऱ्या बसगाडय़ा असे अनेक पर्याय चर्चिले गेले. पण त्याचवेळी उपस्थितांना एक प्रश्न सतावत होता. उद्या मेट्रो आल्यानंतर चारचाकी वाहनांनी प्रवास करणारे मेट्रोचा वापर किती करतील? या प्रश्नावर दिल्ली मेट्रोचे उदाहरण दिले जाते. दिल्लीत मेट्रोचे प्रभावी जाळे आहे, तरी तेथील चारचाकी वाहनांची संख्या कमी झालेली नाही. मुंबईत वर्षांला दोन-अडीच लाख दुचाकी आणि चारचाकींची भर पडते. वाहनांची वाढती संख्या आणि रस्ते यांचे प्रमाण व्यस्तच आहे.

एकूणच ही सर्व परिस्थिती पाहता वाहतुकीच्या पायाभूत सुविधा उभे करण्यात आपण खूपच मागे पडलो आहोत. किमान आता सुरूअसलेले काम वेळेत पूर्ण व्हावे जेणेकरून उज्ज्वल भविष्यातील वाटचाल सुकर होईल हीच प्रत्येक मुंबईकराची भावना आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 3:13 am

Web Title: traffic congestion due to metro work and flyovers in mumbai zws 70
Next Stories
1 पावसाचा धिंगाणा, मुंबईकरांची परवड
2 मराठीसाठी चळवळ व्हावी!
3 तिन्ही डॉक्टरांची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव
Just Now!
X