दुतर्फा वाहनतळांमुळे मालाडमध्ये वाहतूक कोंडी; विद्यार्थी मेटाकुटीला

चिंचोळ्या रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे मालाड पूर्वेकडील मंचुभाई मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. या वाहतूककोंडीचा सर्वात जास्त त्रास या मार्गावर असलेल्या फातिमा देवी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

मालाड पूर्वेकडील भुयारी मार्गाबाहेरील दत्त मंदिर रोड जंक्शन ते मंचुभाई मार्गावर दररोज स्थानिक रहिवाशी सकाळी दुचाकी उभ्या करून कामाला निघून जातात. यामुळे दिवसाचे आठ ते दहा तास या दुचाकी तिथेच उभ्या असतात.

परिणामी या मार्गावर इतरांना वाहन उभे करता येत नाही. त्यात दुतर्फा वाहने उभी केल्याने १४ फुटांच्या या रस्त्यावरील अर्धा भाग वाहनांनी भरून जातो. त्यामुळे रिक्षा, बसगाडय़ा, अवजड वाहनांना येथून मार्ग काढताना नाकीनऊ येते. या वाहतूक कोंडीचा सर्वात जास्त त्रास विद्यार्थ्यांना होतो.

या मार्गावर फातिमा देवी स्कूल आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी परतताना विद्यार्थ्यांना या मार्गावरून वाट काढणेदेखील जिकिरीचे ठरते. अनेकदा वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना येथे मुलांना वाहनांची धडक बसल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.

सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेकरिता शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून फातिमा देवी शाळा प्रशासनाचा या मार्गावरील अनधिकृत वाहनतळ हटवून रस्ता मोकळा करण्यासाठी गोरेगाव वाहतूक विभाग व दिंडोशी पोलिसांकडे पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र अद्याप याची अंमलबजावणी झालेली नाही, असे राजेश पंडय़ा यांनी सांगितले.