महामार्गांवर वाहनांची गर्दी; शहरांच्या सीमांवर कोंडी

मुंबई : एक रजा घेतल्यानंतर मिळणाऱ्या सलग चार दिवसांच्या सुट्टीची संधी साधून पर्यटनास निघालेल्यांच्या वाहनांमुळे शनिवारी अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर अलिबाग, मुरुड, किहीम, लोणावळा, जुन्नर अशा ठिकाणी शनिवारी सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी वाढू लागली होती.

चौथ्या शनिवारची सुट्टी, रविवार, सोमवार आणि मंगळवारचा प्रजासत्ताक दिन अशा चार सुट्ट्या साधून अनेकांनी शहरातून पर्यटनस्थळांकडे धाव घेतली. ३१ डिसेंबरच्या  साजरीकरणावर रात्रीच्या संचारबंदीमुळे निर्बंध आले होते. त्याचा पर्यटनावरही काही प्रमाणात परिणाम झाला. मात्र जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यातील मोठी सुट्टी आणि पुन्हा अवतरलेली थंडी हा योग साधून शहरवासीयांनी पर्यटनस्थळे गाठली.  ‘जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात पर्यटकांची संख्या अतिशय कमी झाली होती, मात्र या आठवड्यापासून पुन्हा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुढील १५ दिवस असाच प्रतिसाद मिळेल, अशी आशा पवना धरणाजवळील शिळिंम येथील अंजनवेल कृषी पर्यटन केंद्राचे राहुल जगताप यांनी व्यक्त केली. खंडाळा येथील ‘ड्यूक्स रिट्रिट’ पूर्ण क्षमतेने सुरू असून, शनिवारी ते ८५ टक्के  भरल्याचे व्यवस्थापक राजेश गुलेरिया यांनी सांगितले. पुढील तिन्ही दिवस पर्यटकांचा ओढा राहील, असेही ते म्हणाले.

आडबाजूच्या पर्यटनस्थळांना भेट देण्याचा पर्यटकांचा कल आहे. १५ दिवसांपूर्वीच सर्व नोंदणी पूर्ण झाली आहे. विशेषत: २४ ते २६ जानेवारी या कालावधीसाठी चौकशी करणाऱ्यांना नकार द्यावा लागत आहे, असे जुन्नरजवळील पराशर कृषी पर्यटन केंद्राचे मनोज हाडवळे यांनी सांगितले. ‘एमटीडीसी’च्या रिसॉर्ट्सना मोठा प्रतिसाद मिळत असून माळशेज, भंडारदरा येथील रिसॉर्ट पूर्ण भरले आहेत.

रात्रीच्या संचारबंदीमुळे नववर्ष स्वागताच्या वेळी कॅम्पिंगवर बंदी होती. मात्र या आठवड्याच्या अखेरीस काही ठिकाणी कॅम्पिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘चार दिवसांच्या सुट्टीत कॅम्पिंगला सुमारे ६० टक्के  प्रतिसाद मिळाल्याचे, पवना लेक कॅम्पिंगचे रवि ठाकर यांनी सांगितले. तसेच हौशी डोंगरभटकेदेखील या सुट्टीत बाहेर पडल्याचे दिसून येत आहे.

संथगती… मुंबई ते पुणे आणि मुंबई ते गोवा महामार्गावर सकाळी काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पुण्याला जाताना सकाळी १०च्या सुमारास खालापूर टोलनाक्याजवळ एक तास कोंडी झाली होती.