समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी ११.२१ कोटी रुपये

पालिकेने दादर-माहीम चौपाटीच्या स्वच्छतेसाठी तब्बल ११.२१ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला असून चौपाटीची स्वच्छता करणाऱ्या कंत्राटदाराला पावसाळ्यात प्रतिदिन ६५ हजार ५०० रुपये, तर अन्य काळात प्रतिदिन ३५ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत. कंत्राटदाराला दादर-माहीम चौपाटीच्या स्वच्छतेचे कंत्राट सहा वर्षांसाठी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

मुंबईमधील समुद्रकिनारे देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. मोठय़ा संख्येने देशी-विदेशी पर्यटक चौपाटय़ांवर जात असतात. तसेच स्थानिक रहिवासीही मोठय़ा संख्येने फेरफटका मारण्यासाठी चौपाटीवर जात असतात. काही चौपाटय़ांवर फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरल्या आहेत. समुद्राला येणाऱ्या उधाणामुळे लाटांसोबत मोठय़ा प्रमाणावर कचरा किनाऱ्यावर येत असतो. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात किनाऱ्यावर अस्वच्छता होते. तसेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सवामध्ये समुद्रकिनाऱ्यांवर विसर्जन सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावर पूजाही करण्यात येते. त्यामुळेही किनाऱ्यांवर कचरा पसरतो. किनाऱ्यांवर पसरलेला कचरा मनुष्यबळ आणि यंत्राच्या साहाय्याने स्वच्छ केला जाते. मात्र मुंबईमधील समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी पालिकेला कोटय़वधी रुपये खर्च करावे लागत आहेत.

दादर-माहीम चौपाटीच्या स्वच्छतेच्या कामासाठी ५० कामगार कार्यरत असतात. या चौपाटीच्या स्वच्छतेसाठी यंत्राचाही वापर करण्यात येतो. मात्र या चौपाटीच्या स्वच्छतेचे कंत्राट १७ सप्टेंबर रोजी संपुष्टात आले असून पालिकेने या कामासाठी क्लिअर एन्व्हायरो कंपनीची निवड करण्यात आली आहे. दादर-माहीम चौपाटीच्या स्वच्छतेसाठी सहा वर्षांचे ११ कोटी २१ लाख ६८ हजार रुपयांचे कंत्राट या कंपनीला देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

दरवर्षी सुमारे ५७ टन कचरा

दादर-माहीम चौपाटीवर दरवर्षी सुमारे ५७ टन कचरा जमा होतो. या चौपाटीवरून पावसाळ्यात १ जून ते ३० सप्टेंबर या काळात ४५ टन, तर १ ऑक्टोबर ते ३१ मे या काळात १२ टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.