२२ डिसेंबरला शुभारंभ
दिवसेंदिवस वाढणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या गर्दीवर तोडगा म्हणून मध्य रेल्वेवर दोन आसनी गाडी चालविण्यात येणार आहे. ही गाडी २२ डिसेंबरला पहिल्यांदा धावेल, अशी अपेक्षा आहे.
भावेश नकाते याच्या रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवाशांची दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी सामावून घेण्यात सध्याची रेल्वे सेवा अपुरी पडते आहे. नव्या मार्गिका टाकल्याशिवाय या गर्दीवर तोडगा निघणे शक्य नाही; परंतु नव्या मार्गिकांच्या मार्गातच अनंत अडचणी असल्याने रेल्वे प्रशासन इतर उपाययोजनांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करते आहे.
नखाते यांच्या मृत्यूनंतर प्रवाशांमध्ये निर्माण झालेल्या संतापाचे चटके लोकप्रतिनिधींनाही बसले.
कपिल पाटील, श्रीकांत शिंदे, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, किरीट सोमैय्या या खासदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रवाशांच्या व्यथा मांडल्या. त्यात प्रवाशांची वहनक्षमता वाढविण्यासाठी काय करता येईल, याबाबतही चर्चा झाली होती.
त्यात डब्यांच्या बैठकीच्या रचनेत फेरफार करून नेहमीच्या तीनऐवजी दोन आसनी गाडी चालविता येईल का, जेणेकरून अधिक प्रवासी उभ्याने का होईना पण प्रवास करू शकतील, असा विचार पुढे आला होता.
तूर्तात एका डब्यात असे बदल करून गाडी चालविण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. अशी अंतर्गत रचना असलेली गाडी तयार असून येत्या २२ डिसेंबरला मध्य रेल्वेवर धावेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली.