शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला

मुंबईत ‘हम्बोल्ट पेंग्विन’ आणणे ही क्रॉफर्ड मार्केटमधून कबुतर आणण्यात इतकी सोपी गोष्ट नव्हती. आता मुंबईकरांना ‘पारदर्शक’ काचेतून पेग्विनचे दर्शन घेता येईल, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी भाजपचे नाव न घेता हाणला.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानाचा (राणीची बाग) विकास सुरू असून या विकासाच्या निमित्ताने विदेशातील प्राणी, पक्षी राणीच्या बागेत आणण्यात येणार आहेत. त्यातील पहिले पाहुणे हम्बोल्ट पेंग्विन काही महिन्यांपूर्वी मुंबईत दाखल झाले. राणीच्या बागेत आलेल्या या पाहुण्यांची तात्पुरती व्यवस्था वातानुकूलीत यंत्रणा असलेल्या अत्याधुनिक कक्षात करण्यात आली होती. मात्र आजारी पडल्यामुळे एका पेंग्विनचा मृत्यू झाला आणि विरोधकांनी पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठविली होती.

राणीच्या बागेत पेंग्विनसाठी आधुनिक यंत्रणेचा समावेश असलेले नवे कक्ष उभारण्यात आले असून त्यात त्यांची रवानगी करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात येत होते. काही दिवसांपूर्वी त्यासाठी मुहूर्तही निवडण्यात आला होता. मात्र या कक्षाच्या कामात काही दोष आढळल्याने पेंग्विनची रवानगी लांबणीवर पडली होती.

बहुचर्चित आणि बऱ्याच कालावधीच्या प्रतीक्षेनंतर अखेर शुक्रवारी या कक्षाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. पेंग्विन कक्षासोबत प्रवेश प्लाझा, जापनिस गार्डन, गुलाब वाटिकेचे उद्घाटनही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त अजोय मेहता, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर आदी मान्यवर उपस्थित होते. पेंग्विन कक्षाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने राणीच्या बागेत शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी राणीच्या बागेचा परिसर दणाणून सोडला होता.

आपले काम बोलके असते, तेव्हा आपल्याला अधिक बोलण्याची गरज भासत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांचे नाव न घेता हाणला. विदेशातून मुंबईत पेंग्विन आणण्याचे आव्हान मोठे होते. क्रॉफर्ड मार्केटमधून कबुतर आणण्यात इतकी ही सोपी गोष्ट नव्हती. परंतु पालिका प्रशासनाने हे काम करुन दाखविले. त्यामुळे आता मुंबईकरांना ‘पारदर्शक’ काचेतून पेंग्विन दर्शन घडणार आहे, असेही खडे बोल त्यांनी पेंग्विनबाबत टीका करणाऱ्यांना सुनावले.

प्रत्येक शहर आधुनिक आणि परिपूर्ण आसायलाच हवे. मुंबईचा विकास नियोजन आराखडा तयार करताना या गोष्टी डोळ्यासमोर ठेवण्यात आल्या होत्या. त्याचे हम्बोल्ट पेंग्विन हे उत्तम उदाहरण आहे, असे मत व्यक्त करी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी भविष्यात राणीच्या बागेत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेतला.

पेंग्विन कक्षाच्या उद्घाटनाकडे भाजपची पाठ

राणीच्या बागेच्या नूतनीकरणाचा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. संपूर्ण राणीच्या बागेचा विकास झाला असता तर ती सुंदर बनली असती. तसेच पालिका प्रशासन किंवा महापौर यांच्याकडून आम्हाला कार्यक्रमाचे कोणतेही आमंत्रण नव्हते. यामुळे आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहिलो नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी व्यक्त केली.

पैशांचा अपव्यय

मुंबईमधील नागरी सुविधांमध्ये त्रुटी आहेत. नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. असे असताना कोटय़वधी रुपये खर्च करून पेंग्विन दर्शनाचा खेळ करण्याची काय गरज होती. हा करदात्या मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस गटनेते रवी राजा यांनी व्यक्त केली.

प्रवेश शुल्क वाढण्याची शक्यता

उद्यानाचे प्रवेश शुल्क व पेंग्विन दालनाचे प्रवेश शुल्क वेगवेगळे असेल असे स्पष्टीकरीण मेहता यांनी दिले. पेंग्विन दालनासाठी मोठय़ांना १०० रुपये तर लहान मुलांना ५० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. याचबरोबर राणीच्या बागेचे प्रवेश शुल्क पाच रुपयांवरून ५० रुपये करण्याचा प्रस्ताव असल्याने मुंबईकरांना भविष्यात पेंग्विन दर्शन महाग पडणार असल्याचे चित्र आहे.