दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या बांद्रा-कुर्ला काँप्लेक्समधील (बीकेसी) एका हॉटेलमध्ये मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुपचूप भेट घेतली, असा खळबळजनक दावा राष्ट्र्वादी काँग्रसचे नेते जयंत पाटील यांनी गुरुवारी केला.

हॉटेलवर झालेल्या भेटीदरम्यान या दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाल्याचेही पाटील यांनी राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तनाचा रॅलीमध्ये सांगितले. याद्वारे युती तोडण्याची भाषा करणाऱ्या भाजपा-शिवसेनेवर पाटील कडाडले. त्याचबरोबर अंतिमतः त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पाटील म्हणाले, भाजपा-शिवसेनेत दररोज वाकयुद्ध सुरू होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यंमंत्र्यांना लपूनछपून भेटण्याची अशी काय गरज पडली. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर अमित शहांची त्यांच्यासमोर बोलण्याची त्यांची हिंमत्तच झाली नसती.

सध्या शिवसेना आणि भाजपामधी परस्पर संबंध चांगले नाहीत. मात्र, शिवसेना केंद्रात आणि राज्यात सरकारमध्ये सहभागी आहे. मात्र, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने भाजपावर हल्ला चढवित आहेत. नुकतेच लातूरच्या सभेत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेला युतीच्या संभ्रमात न राहण्याचा इशारा दिला होता. विरोधक सोबत आले तर त्यांना सोबत घेऊन जाऊ अन्यथा त्यांना पटक देंगे असे विधान शाह यांनी केले होते. यावर पलटवार करताना पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले होते की, जर भाजपा पटकवायची भाषा करीत असेल तर आम्ही त्यांना दफन करु.