मुंब्रा-शिळफाटा दुर्घटनेच्या निमित्ताने शुक्रवारी विधान परिषदेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नगर विकास खात्यावर सर्वपक्षीय आमदारांनी हल्ला चढविला. तर बेकायदा बांधकामांवरुन शिवसेनेचे गटनेते दिवाकर रावते आणि राष्ट्रवादीचे आमदार राम पंडांगळे व किरण पावस्कर यांच्यातही चांगलीच खडाजंगी झाली.
नागरिकांना परवडणारी घरे देण्यास सरकार अपयशी ठरल्याचे सांगत विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी  चर्चेच्या प्रारंभीच मुख्यमंत्र्यांवर शरसंधान सुरू केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही या दुर्घटनेला जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. राष्ट्रवादीचे किरण पावस्कर यांनी कोहिनूर मिलचा विषय काढून शिवेसेनवर कुरघोडी करीत चर्चेला भलतेच वळण दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिंब्यामुळेच पिंपरी-चिंचवड पालिकेच्या हद्दीतील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त झाली, मुंबई व ठाण्यात तशी कारवाई का होत नाही, असा सवाल करुन त्यांनी शिवेसनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. राम पंडांगळे यांनीही पावस्करांच्या सुरात सूर मिसळत शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.
अनधिकृत बांधकामे आणि त्यावरील कारवाईकडे होत असेलल्या दुर्लक्षाबद्दल सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याला जबाबदार धरले. ठाण्यातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी काही चटईक्षेत्र निदेर्शाक वाढवून द्यावे, अशी अनेकदा मागणी झाली, परंतु त्यावर काहीच निर्णय होत नाही, अशी टीका रावते यांनी केली. शिळफाटा इमारत दुर्घटनेबद्दल पालिका आयुक्त राजीव यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर निरंजन डावखरे, मुझफ्फर हुसेन, प्रकाश बिनसाळे, अलका देसाई, विद्या चव्हाण, हेमंत टकले, राम पंडांगळे, किरण पावस्कर, आशिष शेलार आदी सदस्यांनी नगर विकास खात्याच्या कारभारावर टीकेची झोड उठविली.

पाकहून येते सिमेंट!
पाकिस्तान व बांगलादेशातून मोठय़ा प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे सिमेंट आणून मुंबई व राज्यभर विकले जात आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे आशिष शेलार यांनी केला. बांगलादेशातून तसेच पाकिस्तानातील लाहोर, रावळपिंडी, कराची येथील कंपन्यांची सिमेंट बाजारभावापेक्षा स्वस्त दरात विक्री केली जात आहे, त्या सिमेंटची येथे तस्करी होत असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात चौकशी करुन कारवाई केली जाईल, असे आश्वासन चर्चेवरील उत्तरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  दिले.