शैलजा तिवले

करोना काळात अखंड सेवा देणारे अनेक जण लसीच्या प्रतीक्षेत असताना ‘खास पाहुण्यां’च्या नावाखाली ४५ व ६० वर्षांखालील व्यक्तींना मात्र लस देण्यात येत आहे. नोंदणी केलेले ज्येष्ठ नागरिक केंद्राबाहेर ताटकळत असताना वयोगटात न बसणाऱ्या किंवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी नसणाऱ्या तरुणांना लस दिली जात असल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यांची नोंदणी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून केली जात आहे.

१ मार्चपासून जे.जे. रुग्णालयात लसीकरणासाठी येणाऱ्या ‘खास पाहुण्यां’ची गर्दी वाढायला लागली आहे. यात आत्तापर्यत अनेक मंत्री, राजकीय नेते लस घेण्यासाठी येऊन गेले आहेत.

ही मंडळी ४५ वर्षांवरील रुग्ण किंवा ६० वरील ज्येष्ठ नागरिक या वयोगटांमध्ये बसत असल्याने त्यांना लस देणे हा प्रक्रियेचा भाग होता. परंतु अलीकडे खास पाहुणे म्हणून मालिकांमधील अभिनेत्यांसह अनेक तरुण मंडळीही लस घेण्यासाठी जे.जे.मध्ये हजेरी लावत असल्याचे निदर्शनास येत आहे.

झाले काय ?

मालिकेतील एका अभिनेत्याने शुक्रवारी त्याच्या कुटुंबीयांसह जे.जे. रुग्णालयात कोव्हॅक्सिन लस घेतली. याच दिवशी ३५ वर्षांखालील दहा तरुणांनी कोव्हिशिल्ड लस जे.जे. रुग्णालयात घेतली. ‘खास पाहुणे’ असल्याने या मंडळीना थेट लसीकरण केंद्रात नेण्यात आले व नाव नोंदवून लसही दिली गेली.

कोव्हॅक्सिनचे केंद्र सुरू

जे.जे.मध्ये सोमवार ते गुरुवार कोव्हॅक्सिन तर शुक्रवारी आणि शनिवारी कोव्हिशिल्ड लस दिली जाते. परंतु अलीकडे ‘खास पाहुण्यां’ची गर्दी वाढली असून यातील काही जणांची कोव्हॅक्सिनची मागणी असते. त्यामुळे शुक्रवार असूनही कोव्हॅक्सिनचे केंद्र  खास पाहुण्यांसाठी खुले ठेवले होते.

दिमतीला शासकीय अधिकारी

‘खास पाहुण्यां’ना रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रात घेऊन येणे, त्यांची नोंदणी, लसीकरण करून देणे यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनाच कामाला लावले आहे. दिवसभरात अशा लोकांची वर्दळ सतत सुरू असल्याने अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवेत गुंतून राहावे लागत असल्याचे दिसून आले.

असे काही होत नाही…

वयोगटात न बसणाऱ्या कोणाचेही लसीकरण केलेले नाही, असे सांगत जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वार यांनी हे आरोप नाकारले आहे.