05 March 2021

News Flash

वाजपेयी यांचा पुतळा पालिका सभागृहात बसविण्यास नकार

प्रशासनाकडून समिती सभागृहाचा पर्याय

(संग्रहित छायाचित्र)

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा पालिका सभागृहात उभारण्यास पालिका प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. सभागृहात जागा कमी असल्यामुळे वाजपेयी यांचा पुतळा स्थायी समिती अथवा अन्य समित्यांच्या सभागृहात उभारण्याचा पर्याय प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे भाजप कोणती भूमिका घेतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिका सभागृहात महात्मा गांधी यांचा पूर्णाकृती, तर छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पं. जवाहरलाल नेहरू, दादाभाई नौरोजी, डोसाभाई कराका, रावसाहेब विश्वनाथ मंडलिक, सर भालचंद्र भाटवडेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आदींचे पुतळे बसविण्यात आले आहेत.

त्याचबरोबर महापुरुषांची ११ तैलचित्रे बसविण्यात आली होती. पालिका सभागृहाला २००० मध्ये लागलेल्या आगीत तैलचित्रांचे नुकसान झाले. यापैकी नऊ तैलचित्रे लवकरच सभागृहात बसविण्यात येणार आहेत.

पालिका सभागृहामध्ये २०१७ मध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचे तैलचित्र बसविण्यात आले असून अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा सभागृहात बसविण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेविका दक्षा पटेल यांनी २०१८ मध्ये पालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. ही ठरावाची सूचना एकमताने मंजूर करून पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली होती. या संदर्भात प्रशासनाने अभिप्राय सादर केला असून सभागृहात वाजपेयी यांचा पुतळा बसविण्यास अभिप्रायात नकार देण्यात आला आहे.

पालिका सभागृहाची बैठक सुरू असताना संबंधित विषयांच्या अधिकाऱ्यांना तेथे उपस्थित राहावे लागते. सध्या सभागृहात के वळ नगरसेवकांना बसण्यास पुरेशी जागा आहे. अधिकारी आणि पत्रकारांना दाटीवाटीने बसावे लागते. एखादा पुतळा बसविल्यास नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या आसन व्यवस्थेवर परिणाम होऊ शकेल. पुतळा आणि तैलचित्र बसविण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे भविष्यात सभागृहात कोणत्याच महापुरुषाचा पुतळा बसविण्यात येणार नाही. पर्याय म्हणून स्थायी समिती अथवा अन्य समिती सभागृहात महापुरुषांचा पुतळा अथवा तैलचित्र बसविणे योग्य ठरू शकेल, असे प्रशासनाने अभिप्रायात नमूद केले आहे.

दरम्यान, स्थायी समिती व अन्य समिती सभागृहात वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास भाजपने परवानगी दिल्यास तसे करता येईल. मात्र त्यासाठी अन्य राजकीय पक्षांच्या नगरसेवकांचीही परवानगी आवश्यक असल्याचे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 12:16 am

Web Title: vajpayee statue refused to be installed in the corporation hall abn 97
Next Stories
1 आयआयटीच्या विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतींपूर्वीच संधी
2 मुंबईत दिवसभरात ५७४ रुग्ण
3 गृहनिर्माण विभागात बदल्यांचा बाजार
Just Now!
X