मुंबई विद्यापीठ आणि भारतीय रेल्वे यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार आता विद्यापीठात रेल्वेशी निगडीत विविध विषयाचा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे.  महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव,  रेल्वे मंत्री सुरेश प्रभू , अवजड उद्योग मंत्री आनंद गीते, विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजेंद्र वेळुकर, मध्य आणि पश्चिम रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल म्हणाले की, मुंबई विद्यापीठ आणि रेल्वे या दोन्हींची सुरुवात साधारण एकाच वेळी मुंबईत झाली. या दोन्ही ही संस्था एकत्र येऊन विकासाच्या दृष्टीने कामे करत आहेत. ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.
तसेच, रेल विकास निगम लिमिटेड आणि दिघी पोर्ट लि या दोघांमध्येही आज सामंजस्य करार झाला. रेल विकास निगम लिमिटेडचे सतिश अग्निहोत्री आणि दिघी पोर्टचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय कलंत्री या दोघांनी सामंजयस्य करारावर सह्या केल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेभ प्रभू, केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते, रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा, मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद आणि राज्याचे अतिरीक्त मुख्य सचिव वाहतूक गौतम चॅटर्जी उपस्थित होते.
३३.७ किमीच्या या प्रकल्पात चार स्थानके असतील. ८४ पूलांपैकी ११ महत्त्वाचे पूल आणि पाच बोगदे असणार आहेत. यामुळे दिघी बंदराची क्षमता सध्याच्या १५ लक्ष टनवरून ३० दशलक्ष टन ऐवढी होईल, असा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विश्वास कलंत्री यांनी व्यक्त केला.
बंदरांचा विकास न झाल्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक औद्योगिक प्रगती खुंटली होती. तर त्या तुलनेत इतर राज्यांनी बंदर विकास करत आघाडी घेतली होती. मात्र, आता महाराष्ट्रही बंदर विकासात मागे राहणार नसून, लवकरचं राज्यातील सर्व भागांपर्यंत हा आर्थिक विकास पोहचेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, देशाला सात हजार लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यातील सातशे किमी एकट्या महाराष्ट्रात आहे. याचा अर्थ एकूण किनारपट्टीच्या दहा टक्के किनारपट्टी महाराष्ट्रात असून, बंदर विकासासाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. या बंदर विकासामुळे कोकण किनारपट्टीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक विकास पोहचेल. तसेच पंतप्रधान मोदी बंदरांच्या विकासाऐवजी बंदरांमार्फत विकास करण्यात उत्सुक आहेत. त्यांचे हेच धोरण रेल्वे मंत्रालयही पुढे चालवणार आहे.