बिहार विधानसभा तसेच विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निवडणुकांचा कार्यक्रम शुक्र वारी जाहीर करण्यात आला असला तरी महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रिक्त सहा जागांच्या निवडणुकांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

राज्यातील पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर तर पुणे व अमरावती शिक्षक आणि धुळे-नंदुरबार स्थानीय स्वराज्य अशा सहा मतदारसंघांतील जागा रिक्त आहेत. धुळे-नंदुरबारची पोटनिवडणूक मार्चच्या अखेरीस होणार होती. परंतु टाळेबंदी लागू झाल्याने ही पोटनिवडणूक लांबणीर पडली. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील जागा या जून महिन्यात रिक्त झाल्या. करोना संकटामुळे या निवडणुका अद्यापही झालेल्या नाहीत.

मध्य प्रदेशसह देशातील ६४ विधानसभेच्या जागा रिक्त आहेत. पोटनिवडणुकांबाबत येत्या मंगळवारी निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. करोनामुळे पोटनिवडणुका लांबणीवर टाकण्याची विनंती काही राज्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रिक्त जागांची निवडणूक घेण्याबाबत आयोगाने माहिती घेतली होती. परंतु अद्याप काहीच निर्णय झालेला नाही, असे सांगण्यात आले.