मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आला असून विधि अभ्यासक्रमाचा विद्यार्थी तीन वर्षे मागणी करत असूनही विद्यापीठाने त्या विद्यार्थ्यांला सुधारित गुणपत्रक दिलेले नाही.

परीक्षा विभागाचा कारभार विद्यापीठात नेहेमीच चर्चेत असतो. विधि शाखेच्या एका विद्यार्थ्यांला परीक्षा विभागाने तब्बल साडेतीन वर्षे त्याची गुणपत्रिका दिलेली नाही. विधि पदव्युत्तर (एलएलएम) अभ्यासक्रमाची परीक्षा या विद्यार्थ्यांने ऑक्टोबर २०१४ मध्ये दिली होती. त्यामध्ये एका विषयात अनुत्तीर्ण झाल्यामुळे या विद्यार्थ्यांने पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज केला. पुनर्मुल्यांकनात विद्यार्थी उत्तीर्ण झाला. मात्र, तरीही त्याला गुणपत्रक मिळाले नाही.

विद्यापीठात याबाबत विचारणा केल्यानंतर नोंदवहीत चुकीच्या विषयासमोर निकाल लिहिला असल्याचे दिसून आले. त्यानंतर आजपर्यंत विद्यापीठाने या विद्यार्थ्यांला त्याच्या बदललेल्या निकालाची गुणपत्रिका दिलेली नाही. आता २०१४ ची कागदपत्रे, उत्तरपत्रिका नष्ट केल्याचे उत्तर विद्यापीठाने विद्यार्थ्यांला दिले आहे. त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांनी चुकीची नोंद केली, तो कर्मचारी देखील नोकरी सोडून गेला असल्याचे उत्तर विद्यापीठातील उपकुलसचिवांनी दिले आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांने दिली. ‘याबाबत तक्रार आली नसून विद्यार्थ्यांची माहिती घेऊन या प्रकरणाची शहानिशा करण्यात येईल,’ असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.