सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. तरीही त्याच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला वाद शमलेला नाही. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू घराणेशाही आणि हिंदी सिनेसृष्टीतील गटबाजीमुळे झाला असा आरोप कंगना रणौतने केला आहे. आता तिने या प्रकरणात महेश भट आणि करण जोहरची चौकशी कधी होणार? असा प्रश्न मुंबई पोलिसांना विचारला आहे.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आजच यशराजच्या आदित्य चोप्रांची तीन तास चौकशी केली. सुशांत सिंह राजपूतने यशराजसोबत केलेलं कॉन्ट्रॅक्ट का रद्द केलं? त्याच्या मृत्यूला हिंदी सिनेसृष्टीतली गटबाजी जबाबदार आहे का? यांसह इतर अनेक प्रश्न आदित्य चोप्रांना विचारण्यात आले. दरम्यान सुशांतच्या मृत्यूप्रकरणी महेश भट आणि करण जोहरची चौकशी कधी होणार असा सवाल कंगना रणौतने उपस्थित केला आहे. ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने हा प्रश्न उपस्थित केला.

आज आदित्य चोप्राची चौकशी करण्यात आली. त्यापाठोपाठ महेश भट आणि करण जोहर यांना सुशांतच्या आत्महत्येविषयी कधी प्रश्न विचारण्यात येतील? असंही कंगनाने विचारलं आहे. अजूनही परवीन बाबीचा मृत्यू कसा झाला ते आपल्या सिनेमांद्वारे महेश भट विकत आहेत. ‘भावनाशून्य गिधाडं’ आहेत असे लोक, जे लोकांना मरताना पाहू शकतात अशीही टीका कंगना रणौतने केली आहे.

याआधीही कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ पोस्ट करुन सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही तर त्याचा बळी घेतला गेला आहे अशी रोखठोक भूमिका मांडली आहे.

काय म्हणाली होती कंगना?
“सुशांत सिंह राजपूतच्या हत्येनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. काही गोष्टी मी वाचल्या तर काही पाहिल्या आहेत. बॉलिवूडमध्ये त्याच्यासोबत जे काही घडत होतं त्यामुळे तो त्रस्त झाला होता असं सुशांतच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितलं. अभिषेक कपूर या दिग्दर्शकासोबत सुशांतने केदारनाथ नावाचा सिनेमा केला होता. त्यांनी असं म्हटलं आहे की सुशांतचं मानसिक आरोग्य हळूहळू बिघडवण्यात आलं. तर अंकिता लोखंडे जिने सुशांतसोबत दीर्घकाळ काम केलं तिने सुशांत सामाजिक स्तरावर त्याचा झालेला अपमान आणि बदनामी सहन करु शकला नाही असं म्हटलं आहे. बॉलिवूडच्या मू्व्ही माफियांनी अत्यंत पद्धतशीरपणे सुशांतची बदनामी केली. त्याचं नाव न घेता त्याला अप्रत्यक्षपणे वाळीत टाकण्याचे प्रकार सुरु केले. ज्यामुळे हळूहळू सुशांत नैराश्याच्या गर्तेत ढकलला गेला.”

आता कंगनाने या सगळ्या प्रकरणात महेश भट आणि करण जोहर या दोघांची चौकशी कधी होणार असा प्रश्न मुंबई पोलिसांना विचारला आहे.