पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप; कारवाईची मागणी

बेकायदेशीररीत्या मध्यरात्री आपल्या घरावर छापा टाकत घरातील ५६ मांजरांना जप्त केल्याच्या विरोधात पुण्यातील महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच या मांजरांना पुन्हा आपल्या ताब्यात देण्याचे आदेश पुणे पोलिसांना द्यावेत, अशी मागणी तिने केली आहे. न्यायालयानेही तिच्या याचिकेची दखल घेत पुणे पोलिसांसह अन्य प्रतिवादींना तिने केलेल्या आरोपांवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

संगीता कपूर या ४२ वर्षांच्या महिलेने ही याचिका केली असून त्यात ५६ मांजरांना ताब्यात देण्यासह घरावर बेकायदेशीररीत्या छापा टाकणाऱ्या पोलिसांवर आवश्यक त्या कारवाईचे आदेश देण्याची मागणीही केली आहे.

न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी कपूर हिच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी या बेकायदेशीर छाप्यादरम्यान पोलिसांनी आपली छळवणूक केल्याची तसेच घरातील सोन्याचे आणि अन्य किंमती दागिनेही ‘चोरल्या’चा आरोप तिच्या वतीने करण्यात आला. त्याचवेळी अंतरिम दिलासा म्हणून जप्त केलेल्या मांजरांना पुन्हा आपल्या ताब्यात देण्याची विनंती तिने न्यायालयाकडे केली. परंतु तिला हा दिलासा देण्यास न्यायालयाने तूर्त तरी नकार दिला आहे. मात्र तिने केलेल्या आरोपांबाबत पोलिसांसह अन्य प्रतिवादींनी म्हणणे मांडण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

कपूर हिची पुण्यात घरे असून असून एका घरात ती आई आणि बहिणीसोबत तेथे राहते, तर एका घरात तिने ५६ मांजरांना ठेवले होते. त्यात तिने वाचवलेल्या मांजरांचा प्रामुख्याने समावेश होता. पोलीस आणि प्राणीमित्र संघटनेच्या काही सदस्यांनी सप्टेंबर महिन्यात एका दिवशी मध्यरात्री मांजरांना ठेवण्यात आलेल्या घराचे दार फोडले आणि मांजरांना जप्त केले. तसेच आपण मांजरांची आवश्यक ती काळजी घेतली नाही, त्यांना अस्वच्छ वातावरणात ठेवले, असा दावा करत पोलिसांनी आपल्यावर प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला, असा आरोपही कपूर हिने याचिकेत केला आहे.