वर्ल्ड बँकेने मुंबईच्या एसी ट्रेनला रेड सिग्नल दाखवला आहे. मुंबईच्या ४७ एसी लोकलसाठी निधी देण्यास नकार देत वर्ल्ड बँकेने माघार घेतली आहे. यामुळे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) निधीसाठी इंडियन रेल फायनान्स कॉर्पोरेशनकडे (आयआरएफसी) मदत मागण्याचं ठरवलं आहे. वर्ल्ड बँकेने माघार घेतल्याने पश्चिम रेल्वे प्रवाशांना एसी ट्रेन सेवा मिळण्यासाठी विलंब लागणार आहे. मुंबई मिररने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

मुंबईत सध्या पश्चिम मार्गावर एकच एसी लोकल धावत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार दरम्यान एसी लोकल सेवा दिली जात असून दिवसाला १२ फेऱ्या होतात. निधी देण्यास का नकार दिला आहे यासंबंधी वर्ल्ड बँकेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र नाव उघड न करण्याच्या अटीवर एमआरव्हीसी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन पूर्णपणे विकत घ्यावी की भाडेतत्वावर यावर एकमत होत नव्हतं. तसंच ट्रेनची निर्मिती स्वदेशी असावी की परदेशातून खरेदी करण्यात यावी यावरुनही दुमत होतं.

याशिवाय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड बँकेने विरार – पनवेल कॉरिडोअरला प्राथमिकता दिली जावी असं मत व्यक्त केलं होतं. मात्र अद्याप केंद्राने परवानगी दिल्याने ते शक्य नसल्याचं एमआरव्हीसी अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

सध्या मुंबईत धावत असलेल्या एसी लोकलचं उत्पादन चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत करण्यात आलं आहे. १२ डब्यांच्या एसी ट्रेनसाठी एकूण 3 हजार 491 कोटींचा खर्च असून यामधील 1 हजार 300 कोटी वर्ल्ड बँकेकडून देण्यात येणार होते. ‘वर्ल्ड बँकेने माघार घेतल्याने मोठी समस्या उभी राहिल असं वाटत नाही. आम्ही इंडियन रेल फायनान्स कॉर्पोरेशनसोबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे’, अशी माहिती एमआरव्हीसीचे सीएमडी आर एस खुराना यांनी दिली आहे.