एकरकमी शुल्क भरण्याची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची अट

गरीब, मध्यमवर्गीय आणि नोकरी करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी आधार असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने सर्व नोंदणी शुल्क एकाच वेळी भरण्याचा आदेश दिल्याने विद्यार्थ्यांना व संस्थाचालकांनाही मोठा फटका बसला आहे.

मुंबई, पुण्यासारखी विद्यापीठे हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी २५० रुपये ते पाच हजार रुपयांपर्यंत नोंदणी शुल्क घेत असताना यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे शुल्क २२ हजार रुपये इतके आहे. या शुल्कासह ४० हजार रुपये भरण्याचा बडगा विद्यापीठाने उगारल्याने शेकडो विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात सुमारे सात लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नियमित विद्यापीठांमध्ये शिकणे कठीण असलेल्या व स्वकमाईतून शिक्षण घेणाऱ्या आणि बिकट आर्थिक परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत विद्यापीठाने नोंदणी शुल्कामध्ये भरमसाट वाढ करण्याचा सपाटा सुरू केला आहे. विद्यापीठाकडून शैक्षणिक साहित्य पुरविले जात असले तरी त्याचा दर्जा पाहता हे शिक्षण महागडे होत चालले आहे. या विद्यापीठाशी संलग्न असलेली हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमाची मुंबईत ३६ केंद्रे असून साडेतीन हजार विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत.

महाविद्यालयांच्या किंवा केंद्रांच्या शुल्कामध्ये नोंदणी शुल्काचा अंतर्भाव असतो. गेल्या वर्षीपर्यंत हॉटेल व्यवस्थापनासाठी २२ हजार रुपये नोंदणी व अन्य शुल्क विद्यापीठाकडे सुरुवातीला भरावे लागत होते. त्यामुळे ही रक्कम आधी घेऊन महाविद्यालयांचे किंवा संस्थेचे शुल्क हप्ते बांधून देऊन विद्यार्थी नंतर भरत होते, पण विद्यापीठाने नुकतेच परिपत्रक जारी करून ४० हजार रुपये तातडीने भरण्याचे आदेश जारी केले. त्यापैकी १८ हजार रुपये विद्यापीठ अभ्यास केंद्रांना जानेवारीपर्यंत परत करणार आहे. त्यामुळे आता आणखी १८ हजार रुपयांची तरतूद करणे विद्यार्थ्यांना अवघड झाले असून अनेक केंद्रांमधील हजारो विद्यार्थ्यांनी ही रक्कम भरलेली नाही, अशी माहिती अतिथी महाविद्यालयाच्या प्राचार्या नीता सामंत यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

हीच परिस्थिती बीसीए (बॅचलर इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स) या अभ्यासक्रमाबाबत आहे. दरवर्षी सात हजार रुपये भरावे लागत होते. देशातील कोणत्याही मुक्त विद्यापीठापेक्षा आणि पारंपरिक विद्यापीठांपेक्षा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे नोंदणी शुल्क अनेक पटीने अधिक असताना सुरुवातीलाच सर्व शुल्क भरण्याच्या जाचक अटींमुळे अनेक विद्यार्थी शिक्षण सोडण्याची भीती व्यक्त होत आहे.

हिताचा निर्णय घेण्याचे तावडेंचे आश्वासन

याबाबत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना काही संस्थाचालकांनी निवेदनही दिले आहे. या संदर्भात मी लक्ष घालेन आणि विद्यार्थिहिताचा निर्णय घेतला जाईल. विद्यापीठाने शुल्कवाढ केलेली नाही, असे तावडे यांनी स्पष्ट केले.