मुंबईकरांचा प्रवास सुखमय व्हावा, त्यांना प्रवासासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी आजमितीस अ‍ॅप बाजारात डझनभर अ‍ॅप आहेत. मात्र हे प्रत्येक अ‍ॅप वापरणे आपल्याला शक्य नसते. मग यासाठी एकाच व्यासपीठावर सर्व माहिती उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली. यातून ‘झोपहॉप’चा जन्म झाला.

मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी स्मार्टफोन सदैव तत्पर असतो. अगदी लोकलच्या वेळापत्रकापासून ते आपण असलेल्या फलाटावर कोणती गाडी किती वेळात येणार याचा तपशील विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून आपल्या फोनमध्ये उपलब्ध होतो. इतकेच काय, तर अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा उपभोगणे आपल्याला स्मार्टफोनमुळेच शक्य झाले आहे; पण आजमितीस मुंबईत उपलब्ध असलेल्या विविध वाहतूक पर्यायांसाठी विविध अ‍ॅप्स वापरावे लागतात. मात्र या सर्व सेवा एकत्रित उपलब्ध करून देण्यासाठी एकच अ‍ॅप असेल तर ते आणखी सोयीचे होणार आहे.

मुंबईकरांचा प्रवास सुखमय व्हावा, त्यांना प्रवासासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी आजमितीस अ‍ॅप बाजारात डझनभर अ‍ॅप आहेत. मात्र हे प्रत्येक अ‍ॅप वापरणे आपल्याला शक्य नसते. मग यासाठी एकाच व्यासपीठावर सर्व माहिती उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली होती. याचदरम्यान कारवाले डॉट कॉम या संकेतस्थळाचे संस्थापक मोहित दुबे यांना असे जाणवले की, ज्या समस्या गाडी असलेल्या व्यक्तींना आहे त्याच समस्या सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या व्यक्तींना पण आहेत. यात आपली बस कधी येणार, रस्त्यात किती वाहतूक कोंडी असेल, आपल्याला पुढील प्रवासासाठी कोणती साधने उपलब्ध आहेत, अशा एक ना अनेक समस्यांचा समावेश आहे. या समस्यांना उत्तर देण्यासाठी एक अ‍ॅप असावे असा विचार त्यांच्या मनात आला. मग त्यांनी आयआयटी दिल्लीतील पदवीधर विनायक भवनानी आणि अर्थशास्त्रातील पदवीधर निखिल अग्रवाल यांच्याशी याबाबत चर्चा केली आणि यातून ‘झोपहॉप’चा जन्म झाला.

‘झोपहॉप’च्या माध्यमातून आपण सार्वजनिक वाहतूकही अगदी सुखकर पद्धतीने अनुभवू शकतो. अनेकदा आपण कार्यालयातून निघतो व रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यासाठी बसची वाट पाहात असतो. कधी पंधरा मिनिटे, कधी अर्धा तास इतका वेळ वाट पाहावी लागते; पण आपली बस येत नाही. अशा वेळी हे अ‍ॅप तुमची मदत करू शकते. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला तुमची बस आत्ता कुठे आहे व तुमच्या स्टॉपवर किती वाजता पोहोचेल याचा तपशील समजू शकतो. म्हणजे बस जवळ आल्यावर तुम्ही स्टॉपवर जाऊ शकता. या विविध भागांत पाच हजार सार्वजनिक बसेससाठी ही सेवा उपलब्ध आहे. मुंबई महानगर परिक्षेत्रात बेस्ट, एनएमएएटी, टीएमटी, केडीएमटी, वसई-विरार बस सेवा, मेट्रो, मोनोरेल, मुंबई लोकल सेवा, उबर इतक्या वाहतूक पर्यायांचे मार्गदर्शन या अ‍ॅपवर उपलब्ध आहे. यासाठी कंपनीने संबंधित प्राधिकरणांसोबत सहकार्य करार केले आहेत आणि त्यांच्या बसमध्ये जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. या जीपीएस प्रणालीच्या आधारे लोकांना अ‍ॅपवर बस नेमकी कुठे आहे हे समजणे सोपे जाते. याचबरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतूक पर्यायही यामध्ये सुचविले जातात. इतकेच नव्हे तर आपण लोकल ट्रेनने प्रवास करत असताना पुढचे स्टेशन कोणते आहे याबाबत व्हॉइस अलर्टही या अ‍ॅपद्वारे पाठविला जातो. राज्यात पुणे आणि नागपूर येथेही या अ‍ॅपची सुविधा असून नागपूर महापालिकेच्या सर्व बसगाडय़ा या अ‍ॅपशी जोडल्या गेल्याचे निखिलने सांगितले. बेस्टच्या ताफ्यातील ५० टक्के एसी बसगाडय़ा अ‍ॅपशी जोडल्या गेल्याचेही त्याने सांगितले. याशिवाय उबरसारख्या कंपन्याही या अ‍ॅपशी सहकार्य करार करत असून या अ‍ॅपवरून आपल्याला उबरची गाडी बुक करता येणार आहे. राज्यातील तीन ठिकाणांसह देशभरात अन्य बारा ठिकाणी अ‍ॅपची सेवा उपलब्ध आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून पासही खरेदी करता येतो. यामुळे प्रवाशांचा पास खरेदीसाठी पुन्हा बस आगारात जाण्याचा वेळ वाचतो, असेही निखिलने नमूद केले. आज जगभरात खासगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. आपल्या देशातही जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक वाहतूक वापरावी यासाठी आम्ही या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचेही निखिलने नमूद केले. शासनाचा चलन निश्चलनीकरण आणि स्मार्ट सिटीज या दोन निर्णयांचा आमच्या व्यवसायाला विशेष फायदा होणार आहे. तसेच विविध सरकारी यंत्रणांकडून आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक एका कक्षेत आणणे शक्य झाल्याचेही निखिल म्हणाला.

गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत

या कंपनीत संस्थापक मोहित दुबे, शादी डॉट कॉमचे अनुपम मित्तल, अमित सिंघल, गजवानी यांसारख्या गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली आहे. या अ‍ॅपचा मुख्य उत्पन्नस्रोत हा जाहिराती हा आहे. याचबरोबर अ‍ॅपच्या माध्यमातून होणाऱ्या तिकीट खरेदीवर सेवांना काही टक्के दर आकारला जातो तेही एक उत्पन्नाचे साधन असल्याचे निखिलने नमूद केले.

भविष्याची वाटचाल

हे अ‍ॅप सध्या देशातील पंधरा प्रमुख शहरांमध्ये वापरले जात आहे. यामध्ये आणखी शहरांचा समावेश केला जाणार आहे. याचबरोबरच जास्तीत जास्त लोकांनी या अ‍ॅपचा वापर करावा या उद्देशाने स्मार्टफोन वापराबाबत जागरूकता करण्यात येणार असल्याचे निखिल यांनी नमूद केले.

नवउद्यमींना सल्ला

नवउद्योग सुरू करण्यासाठी कोणतीही वेळ योग्यच असते. फक्त तुमची संकल्पना ही हटके असणे आवश्यक आहे. संकल्पना हटके असली की ती बाजारात जास्त काळ टिकाव धरू शकते. तसेच आपण नवउद्योग सुरू केला व लगेचच यश मिळाले असे होत नाही. यामुळे किमान दोन ते तीन वष्रे तरी उद्योग सुरू ठेवावा म्हणजे त्याच्या भविष्याचे ठोकताळे बांधता येऊ शकतात, असा सल्ला निखिलने दिला.

Niraj.pandit@expressindia.com

@nirajcpandit