राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मागील वर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी गुरुमीत सिंग आणि धर्मराज कश्यप अशा दोघांना अटक करण्यात आली. पुढेही काही कारवाया झाल्या. मात्र प्रकरणाचा मास्टरमाईंड अनमोल बिश्नोई आणि शुभम लोणकर हे दोघंही फरार आहेत. दरम्यान आज बाबा सिद्दीकींचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी मुंबई पोलिसांना भेटले. त्यावेळी त्यांनी आपण तपासाबाबत नाखुश असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाले झिशान सिद्दीकी?
आम्ही जो अर्ज केला होता त्यासंदर्भात ही भेट होती. अनमोल बिश्नोईला भारतात आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात? असं आम्ही त्यांना विचारलं. दरम्यान मला हे जाणवलं की पोलिसांनी आजची बैठक गांभीर्याने घेतली नसावी. कारण मला १२ वाजता बोलवण्यात आलं आणि दुपारी १ ते १.२० च्या दरम्यान बैठक झाली. या बैठकीत गोष्टी हसण्यावारी नेण्यात आल्या. मला सांगण्यात आलं की अनमोल बिश्नोईबाबत तुम्हाला सांगितलं तर तो अलर्ट होईल. माझ्या वडिलांची हत्या झाली आणि पोलीस जर असं बोलणार असती तर ही बाब दुर्दैवी आहे. मास्टरमाईंड शुभम लोणकर, अनमोल बिश्नोई यांना पोलीस आणू शकलेले नाहीत. तपास अधिकारी मला म्हणाले तुम्हाला माहीत आहे त्यांना कसं काय आणणार इथे? मुंबई पोलीस इतके हतबल असतील तर सामान्य नागरिकांनी काय करायचं? असा सवाल सिद्दीकी यांनी केला.
अनमोल बिश्नोईला वाचवलं जातं आहे-झिशान सिद्दीकी
अनमोल बिश्नोईला आणू शकत नाही, त्याला कसं आणणार? हे प्रश्न पोलीस विचारत असतील तर याचा अर्थ त्याला कुठेतरी सुरक्षित केलं जातं आहे. जो काही तपास बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मागच्या वर्षभरात केला त्याबाबत मी आणि माझं कुटुंब नाखुश आहे. हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड पोलीस आणू शकत नाहीत असं सांगत आहेत. असं झिशान सिद्दीकींनी म्हटलं आहे.
बाबा सिद्दीकींची हत्या नेमकी कशी झाली?
बाबा सिद्दीकी हे मागील वर्षी दसऱ्याच्या दिवशी वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकींवर गोळीबार केला आणि त्यानंतर हे तिघंही तिथून पसार झाले. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अद्यापही पोलीस मास्टरमाईंडला पकडू शकलेले नाहीत. त्यामुळे पोलीस जर इतके हतबल असतील तर काय करायचं असा सवाल झिशान सिद्दीकींनी केला. याबाबत आता पुढे काय होणार ते पाहणंही महत्त्वाचं असेल.