इयत्ता बारावीच्या परीक्षेत तोतयेगिरी करून परीक्षा देणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर पेल्हार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, त्यांना अटक केली आहे. सदराचा प्रकार हा जिल्हा शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने उघडकीस आणला होता.

नालासोपारा पूर्व परिसरात असलेल्या सुदर्शन इंग्लिश स्कूल आणि कॉलेज धानीव बाग मध्ये बुधवारी इयत्ता बारावीची परीक्षा सुरु असताना, जिल्हा शिक्षण विभागाच्या भरारी पथकाला या कॉलेजमधील ब्लॉक क्रमांक ७ मध्ये चार विद्यार्थ्यांकडे बनावट परीक्षा ओळख पत्र (हॉल तिकीट) असल्याचा संशय आला. यावेळी पथकाने त्यांची ओळखपत्र आणि महाविद्यालयात असलेला विदा (डाटा) यांची तपासणी केली असता, त्यांचे फोटो आणि महाविद्यालयाचा ठसा वेगळा आढळून आला. यावरून या विद्यार्थ्यांची चौकशी केली असता ते अन्य विद्यार्थ्यांच्या नावावर परीक्षा देत असल्याचे आढळून आले. यामुळे भरारी पथकाने पेल्हार पोलिसांना बोलावून त्यांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. पेल्हार पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ४१९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर सुदर्शन विद्यालयाकडून माहिती देण्यात आली की, सदर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या असून त्या शिक्षण विभागाकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत.