लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या मिनी टॉय ट्रेनला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून मार्च ते मे २०२३ या तीन महिन्यात १.३१ लाख प्रवाशांनी प्रवास केला असून १.०१ कोटींचा महसूल मध्य रेल्वेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
मुंबई, पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे जवळचे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत परिवारासह पर्यटकांनी माथेरानला भेट दिली. याठिकाणी मध्य रेल्वेची १०० वर्षाहून अधिक जुनी नेरळ-माथेरान मिनी टॉय ट्रेन आहे. जी भारतातील काही पर्वतीय रेल्वेपैकी एक आहे. या ट्रेनमधून सफर करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. या उन्हाळ्यात मार्च ते मे २०२३ या तीन महिन्यांत अमन लॉज ते माथेरान दरम्यानच्या शटल सेवेसह एकूण १,३१,४८१ प्रवाशांना माथेरानला नेण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत प्रवासी संख्या १६.९७ टक्के अधिक असून गेल्यावर्षी १,१२,४०१ प्रवाशांनी प्रवास केला. मार्च ते मे २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण १,०१,२८,४२४ रुपयांचा महसूल मिळाला तर मार्च ते मे २०२२ या कालावधी ७२,८७,६८० रुपयांचा महसूल मिळाला आहे. महसुलात या दोन वर्षाच्या तुलनेत ३९.९८ टक्क्यांचीची वाढ झाली आहे.
आणखी वाचा-सिद्धार्थ नगरमधील ६७२ राहिवाशांना थकीत घरभाडे देण्यास सुरुवात
पर्यटनस्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका बजावते, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.