मुंबई : उपनगरीय रेल्वेतून दिवसाला ७० ते ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. उपनगरीय रेल्वेचे जाळेही प्रचंड मोठे आहे. तर आता दुसरीकडे मुंबईतील चार मेट्रो मार्गिका आणि एका मोनोरेल मार्गिकेलाही प्रवाशांची पसंती वाढत आहे. वर्षभरात तर मेट्रो, मोनोमधील प्रवासी संख्या वाढत आहे. चार मेट्रो मार्गिका आणि मोनोरेलमधून २२ ऑगस्ट रोजी दिवसभरात १० लाख प्रवाशांनी प्रवास केला. सध्या दिवसाला मेट्रो, मोनोमधून ९ लाख ९० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणत आहे. १४ मेट्रो मार्गिकेतील मेट्रो १ (घाटकोपर-वर्सोवा), मेट्रो २ अ (दहिसर-अंधेरी पश्चिम), मेट्रो ७ (दहिसर-गुंदवली), मेट्रो ३ (आरे ते आचार्य अत्रे चौक) मार्गिका आणि चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल मार्गिका सेवेत आहेत. मोनोरेलला सुरुवातीपासूनच प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र मागील काही दिवसांपासून हळूहळू थोडी का होईना पण प्रवासी संख्या वाढू लागली आहे.

दुसरीकडे मेट्रो प्रवासाला मुंबईकरांची पसंती वाढत आहे. त्यामुळेच २२ ऑगस्टला चार मेट्रो आणि मोनोरेलमधून एकूण १० लाख प्रवाशांनी प्रवास केला. पहिल्यादांच इतक्या मोठ्या संख्येने मोनो, मेट्रोला दैनंदिन प्रवासी संख्या मिळाली. तर सध्या चार मेट्रो मार्गिकेवरून आणि मोनोरेलमधून दिवसाला सरासरी ९ लाख ९० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत.

मेट्रो १ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या २२ ऑगस्टला ५ लाख ६६हजार ८५१ इतकी होती, तर मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेवरून या दिवशी ३ लाख ३५ हजार ०६९ प्रवाशांनी प्रवास केला. तर मेट्रो ३ मार्गिकेवरून २२ ऑगस्ट रोजी ७६ हजार १७७ प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रो ३ मार्गिकेवरील ही आजवरची सर्वाधिक प्रवासी संख्या असल्याचे म्हटले जात आहे.

मोनोरेल मार्गिकेवरून २२ ऑगस्ट रोजी १२ हजार २३५ प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रो, मोनोरेलला मुंबईकरांचा प्रतिसाद वाढत आहे. तर येत्या काळात मोनो, मेट्रो मार्गिकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आणखी वाढेल आणि मेट्रो, मोनोरेल मुंबईच्या नवीन जीवनवाहिन्या बनतील, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त होत आहे.