मुंबई : गेल्या महिन्याभरापासून मुंबईमध्ये सुरू असलेली १० टक्के पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच तलावक्षेत्रात जुलै २०२३ मध्ये पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पाणीसाठा ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. हीच परिस्थिती ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये कायम राहील असा अंदाज असल्यामुळे पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. बुधवार, ९ ऑगस्ट २०२३ पासून पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतला.
यंदा पावसाळ्यात सुरुवातीला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पावसाने ओढ घेतल्यामुळे जलसाठा रोडावला होता. पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १ जुलै २०२३ पासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणामध्ये मंगळवारी ८१.४४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. जलसाठ्यात सुधारणा झाल्यामुळे पाणी कपात रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव जल अभियंता विभागाने महानगरपालिका आयुक्तांकडे पाठवला होता. आयुक्तांनी मंगळवारी या प्रस्तावाला मंजुरी देत पाणी कपात रद्द केली.
हेही वाचा >>> मुंबईकरांसाठी खुषखबर! पाणी कपातीचे संकट लवकरच टळण्याची शक्यता
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांमध्ये आजघडीला ११ लाख ७८ हजार ७५१ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा पाणीसाठा एकूण साठवण क्षमतेच्या ८१.४४ टक्के आहे. मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी ही चार धरणे पूर्ण क्षमतेने, तर मध्य वैतरणा धरण ९६ टक्के भरल्यामुळे पाणी कपात रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली होती. आता पाणीसाठ्यात सुधारणा झाली आहे. भातसा आणि उर्ध्व वैतरणा या धरणांमधून मुंबईकरांना सर्वात जास्त पाणीपुरवठा करण्यात येत असून या धरणांमधील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. भातसा धरणात ७४ टक्के, तर ऊर्ध्व वैतरणा धरणात ६४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणक्षेत्रात तुरळक पाऊस पडत असला तरी मातीतून झिरपणाऱ्या पाण्यामुळे धरणांतील पाणी पातळी वाढ होत आहे. या सात धरणांमधून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.
पाण्याचा जपून वापर करा
आता पाणी कपात रद्द करण्यात आली असली तरी ऑगस्ट व सप्टेंबर २०२३ मध्ये काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तूर्तास तलावक्षेत्रात पुरेसा जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा. – इक्बाल सिंह चहल आयुक्त, मुंबई महानगरपालिका
दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा
८ ऑगस्ट २०२३….. ११ लाख ७८ हजार ७५१ दशलक्ष लिटर…..८१.४४ टक्के
८ ऑगस्ट २०२२…… १३ लाख ४० हजार ५०८ दशलक्ष लिटर…… ९२.६२ टक्के
८ ऑगस्ट २०२१…… ११ लाख ६४ हजार २०१ दशलक्ष लिटर……. ८०.४४ टक्के
कोणत्या धरणात किती पाणीसाठा
उर्ध्व वैतरणा …. ६४.५६ टक्के
मोडक सागर ….१०० टक्के
तानसा ….. ९९.७५ टक्के
मध्य वैतरणा .. ९६.१४ टक्के
भातसा ….. ७४.८५ टक्के
विहार ….१०० टक्के
तुलसी … १०० टक्के