श्री साई शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिर्डी विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
जगभरातून शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत शिर्डी शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या काकडी येथे २६४ कोटी रुपये खर्चून विमानतळाची उभारणी करण्यात येत आहे. राज्य शासन आणि श्री साईबाबा संस्थान यांच्यामार्फत आजपर्यंत या कामासाठी २२० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या उर्वरित कामांसाठी आणखी १०० कोटी देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.