मुंबई : नायर रुग्णालयामध्ये १४ वर्षाच्या मुलाचा हेपेटायटिस बी आणि लेप्टोने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कस्तुरबा रुग्णालयातून १६ ऑगस्ट रोजी अत्यवस्थ स्थिती नायर रुग्णालयात हलविण्यात आले होते. रुग्णालयात दाखल होताच त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. मुंबईत लेप्टो व हेपेटायटिसच्या रुग्णांच्या संख्येत ऑगस्टमध्ये घट झाली असली तरी यावर्षी प्रथमच लेप्टो व हेपेटायटिस बी या आजाराने १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा >>> ६३ कोटींच्या बँक फसवणुकीप्रकरणी कंपनीच्या संचालकाला ईडीकडून अटक

कुर्ला येथील रहिवासी असलेल्या या मुलाला ताप येत असल्याने कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला नायर रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून ४२ मिनिटांनी त्याला नायर रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये आणण्यात आले. त्यावेळी नायरमधील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला तातडीने लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) दाखल केले. तसेच त्याची रक्त तपासणी व अन्य चाचण्या केल्या. यामध्ये त्याची मलेरिया आणि डेंग्यूची चाचणी नकारात्मक आली. तर त्याला लेप्टो आणि हेपेटायटिस बी झाला असल्याचे स्पष्ट झाले. हेपेटायटिस बी मुळे त्याचा यकृत निकामी झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर सर्व उपचार तातडीने सुरू केले. मात्र १८ ऑगस्टला सकाळी ८.३० वाजता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.