मुंबई : दहिसर ते मिरारोड मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेड उत्तन येथील डोंगरीत बांधण्यात येत असून या कारशेडसाठी येथील १,४०६ झाडे कापावी लागणार आहेत. त्यानुसार मिरा-भाईंदर पालिकेने याबाबत नागरिकांकडून सूचना-हरकती मागविल्या आहेत. नागरिकांनी, पर्यावरणप्रेमी, पर्यावरणतज्ज्ञांनी इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांच्या कत्तलीला तीव्र विरोध दर्शविला आहे.

मिरारोड, उत्तनमधील डोंगरी हा एकमेव हिरवळीचा पट्टा आहे. अशावेळी हा पट्टा नष्ट झाल्यास पर्यावरणाला मोठा धक्का पोहचणार असून त्याचा मानवी आरोग्यावरही परिणाम होणार आहे अशी भीती व्यक्त करत पर्यावरणतज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमींनी ही वृक्षतोड रोखण्याची मागणी केली आहे.दहिसर ते मिरारोड ही १०.५ किमीची मेट्रो ९ मार्गिका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतली आहे.या मार्गिकेचे कारशेड राई, मुर्धा, मोर्वा येथे प्रस्तावित केले होते. मात्र तेथील स्थानिकांचा विरोध पाहता राज्य सरकारने मेट्रो ९चा उत्तन, डोंगरीपर्यंत विस्तार करत कारशेड डोंगरी येथे बांधण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाप्रमाणे आता लवकरच कारशेडच्या कामाला सुरुवात होणार आहे.

हेही वाचा…शिंदे सरकारच्या काळात रस्त्यांची ३० टक्केच कामे पूर्ण, ‘दोन वर्षांत खड्डेमुक्त मुंबई’चे स्वप्न अधुरेच

या कामासाठी येथील १,४०६ झाडे कापावी लागणार असल्याने मिरा-भाईंदर पालिकेने यासंबंधीची जाहीर सूचनेद्वारे नागरिकांकडून सूचना-हरकती मागविल्या आहेत. नागरिकांनी, पर्यावरणप्रेमींनी, पर्यावरणतज्ज्ञांनी वृक्षतोडीला विरोध करत अधिकाधिक सूचना, हरकती नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.

मेट्रो ३च्या कामाला उशीर

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा ७ ऑक्टोबरला वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबईकरांना बीकेसी ते कफ परेड हा टप्पा कधी पूर्ण होणार याची प्रतीक्षा आहे. दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मे २०२५ अशी तारीख दिली आहे. मात्र, त्या वेळेत हा संपूर्ण टप्पा पूर्ण होणार नाही. बीकेसी ते आचार्य अत्रे चौकपर्यंत टप्प्याचे काम मार्च २०२५मध्ये पूर्ण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय ‘एमएमआरसी’ने घेतला आहे. त्यानुसार तो मे २०२५मध्ये वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. टप्पा २ अ नावाने बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, तर टप्पा २ ब नावाने आचार्य अत्रे चौक ते कफ परेड कार्यान्वित केला जाईल. टप्पा २ अ कार्यान्वित झाल्यानंतर काही महिन्यांनी टप्पा २ ब वाहतूक सेवेत दाखल होईल.‘एमएमआरसी’एच्या ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेमुळे आरे ते बीकेसी प्रवास अतिवेगवान आणि सुकर झाला असला तरी त्याला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद नाही.

हेही वाचा…नायर रूग्णालय दंत महाविद्यालयाचा अमेरिकास्थित ‘पिएर फॉचर्ड अकॅडमी’तर्फे सन्मान!

मात्र, ही संपूर्ण मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास चांगला प्रतिसाद मिळेल असा दावा ‘एमएमआरसी’कडून केला जात आहे. आतापर्यंत बीकेसी ते कफ परेड मार्गिकेचे ८८.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यातील मे २०२५पर्यंत आरे ते आचार्य अत्रे चौक अशी भुयारी मेट्रो धावेल.

टप्प्यांमध्ये बदल

‘एमएमआरसी’ने काही महिन्यांपूर्वी आरे ते बीकेसी, बीकेसी ते वरळी आणि वरळी ते कफ परेड हे तीन टप्पे जाहीर केले होते. त्यानंतर त्यामध्ये आरे ते बीकेसी आणि बीकेसी ते कफ परेड असा बदल करण्यात आला. आता त्यात पुन्हा बदल करून बीकेसी ते आचार्य अत्रे टप्पा आणि आचार्य अत्रे ते कफ परेड असे नवीन टप्पे असतील असे सांगण्यात आले आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे हा टप्पा मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती ‘एमएमआरसी’च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकासासाठी शहरे भकास

डोंगरी येथे कारशेड बांधण्याचा निर्णय घेत मोठ्या संख्येने झाडे कापण्याचा घाट घातला आहे. ही बाब गंभीर असून याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागणार आहे असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. दरम्यान, याविषयी ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.डोंगरीतील झाडांच्या कत्तलीबाबतच्या नोटीशीत अनेक त्रुटी आहेत. काही तपशीलांचा अभाव आहे. त्यामुळे याबाबतही पालिकेकडे स्पष्टीकरण मागविण्यात येईल. धीरज परब, पर्यावरणप्रेमी