संजय बापट, लोकसत्ता
मुंबई : पाऊस आणि हवामानातील बदलाचा मोठा फटका राज्यातील साखर उद्योगाला यंदा बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या वर्षी विक्रमी साखर उत्पादन करीत जगात तिसरे स्थान पटकाविणाऱ्या महाराष्ट्रातील साखरेच्या उत्पादनात यंदा मात्र सुमारे १२ ते १५ लाख मेट्रीक टनांची घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील (सन २०२१-२२) गळीत हंगामात राज्यात तब्बल १३७ लाख मेट्रीक टन साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. त्यावेळी राज्यात १४ लाख ८७ हजार हेक्टरवर ऊसाची लागवड झाली होती. त्यावेळी राज्याने देशांतर्गत साखर उत्पादनातील उत्तर प्रदेशाची मक्तेदारी मोडीत काढताना राज्याने साखर उत्पादनात जगात तिसरे स्थान पटकाविले होते. यंदाही राज्यात ऊसाच्या लागवडीत वाढ झाल्याने विक्रमी साखर उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र यंदाच्या हंगामात लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊनही साखर उत्पादनात घट येण्याची भीती आहे.
यंदाच्या हंगामासाठी राज्यात सुमारे १४ लाख ८७ हजार हेक्टरवर ऊस लागवड तर प्रति हेक्टर ९५ टन ऊस उत्पादन आणि १३८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र गेल्या दोन अडीच महिन्यातील ऊस गाळपाच्या आढाव्यानंतर साखर उत्पादन घटण्याचा अंदाज साखर संघ आणि साखर आयुक्तालयाने वर्तविला आहे. आतापर्यंत ७१७ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले असून ६९ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळप हंगामाचा आढावा घेतल्यानंतर साखरम् आयुक्तालयाने साखर उत्पादनाचा सुधारित अंदाज राज्य आणि केंद्र सरकारला नुकातच कळविला आहे. त्यानुसार आता प्रति हेक्टर ८९ टन यमप्रमाणे १२८ लाख मेट्रीक टन साखर म्हणजेच आधीच्या अंदाजापेक्षा १० लाख मेट्रीक टनाने कमी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर साखर संघाने ही घट १२ ते १५ लाख मेट्रीक टनापर्यंत जाईल अशी भीती व्यक्त केली आहे. गेली दोन वर्षे करोनामुळे ऊस लागवडीत बियाणांमध्ये बदल न होणे, मोठय़ाप्रमाणात खोडवे ऊस असल्याने उत्पादनावर परिणाम दिसत असल्याचे राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी सांगितले.