मुंबईतील मुलुंड परिसरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपींनी पीडित मुलीच्या आईला चाकुचा धाक दाखवत हे विकृत कृत्य केलं आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गुन्हेगारांना मुंबई पोलिसांचा धाक नसल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचंही राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं.

राष्ट्रवादी काँग्रेसने ‘एक्स’वर (ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, “सर्वात सुरक्षित शहर अशी ओळख असलेल्या मुंबई शहरात महिलांची सुरक्षा धोक्यात असल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच धावत्या टॅक्सीमध्ये १४ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. ही अत्यंत दुर्दैवी घटना ताजी असतानाच आज मुलुंड येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तसेच तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.”

हेही वाचा- संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल

“मुंबई पोलीसांसह राज्याच्या गृह खात्याने या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून त्यात दोषी आढळलेल्या नराधमांवर कठोर कारवाई करावी. तसेच पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी घ्यावी आणि त्यादृष्टीने कार्यवाही करावी,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली.

हेही वाचा- “होय, बलात्कार करण्यासाठी घरात शिरलो, पण…”, मुंबईतील एअर हॉस्टेसच्या हत्येप्रकरणी आरोपीची धक्कादायक कबुली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीने पोस्टमध्ये पुढे म्हटलं, “मुंबईतील महिला सुरक्षित रहाव्यात यासाठी राज्याच्या गृह खात्याने निर्भया पथकाची निर्मिती केली आहे. तरीसुद्धा अशा दुर्दैवी घटना घडत असतील तर हे मुंबईसह राज्याच्या पोलीस खात्याचे अपयश आहे. गुन्हेगारांना मुंबई पोलिसांचा धाक नसल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) याचा तातडीने आढावा घेऊन महिला सुरक्षिततेच्या दिशेने योग्य ते पाऊले उचलावीत.”