मुंबई : महानगर गॅसच्या पाइपलाइनमध्ये झालेल्या बिघाडाचा फटका मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील हजारो वाहनचालकांना सोमवारी बसला. मुंबई परिसरातील १६४ सीएनजी पंप बंद होते. त्याचा मोठा परिणाम विशेषत: कॅब, टॅक्सी, रिक्षा वाहतुकीवर झाला. मंगळवारी दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असून तोपर्यंत वाहतूक कोलमडण्याची शक्यता आहे.
ट्रॉम्बे येथील आरसीएफ परिसरात ‘गेल’च्या मुख्य गॅसपुरवठा वाहिनीमध्ये बिघाड झाला. त्याचा परिणाम वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) येथे गॅसपुरवठ्यावर झाला. सीजीएस वडाळा येथे गॅसपुरवठा थांबल्यामुळे आणि एमजीएल वाहिनी जोडणीमुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील काही सीएनजी पंप सोमवारी बंद होते. एमजीएलच्या एकूण ३८९ सीएनजी पंपापैकी २२५ सीएनजी पंप कार्यरत होते, तर घरगुती पीएनजी ग्राहकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय प्राधान्याने पुरवठा करत आहे, असे महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात आले.
गॅसपुरवठा वाहिनीची दुरुस्ती झाल्यानंतर आणि सीजीएस वडाळा येथे पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर एमजीएलच्या नेटवर्कमधील गॅसपुरवठा सामान्य होईल. दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर असून १८ नोव्हेंबर दुपारपर्यंत गॅसपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित आहे, असे एमजीएलकडून प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून सांगण्यात आले. मात्र त्यामुळे मंगळवारीही वाहतुकीवरील परिणाम कायम राहण्याची शक्यता आहे. सीएनजी पंपावरील गॅसचा शिल्लक साठाही सोमवारी संपत आला होता. त्यामुळे मंगळवारी पुरवठा सुरळीत होईपर्यंत आणखी काही पंप बंद होण्याची शक्यता आहे.
पंपांवर वाहनांच्या रांगा
मुंबई बहुतांश रिक्षा, टॅक्सी आणि ॲप आधारीत खासगी टॅक्सी या सीएनजीवर चालतात. रविवारी सीएनजी पुरवठा ठप्प होणार असल्यानचे समजताच रात्रीपासून मुंबईतील विविध सीएनजी पंपावर वाहनचालकांची गर्दी उसळली होती. रात्रीपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनांच्या रांगेमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीही झाली होती. गॅस नसल्याने त्याचा मोठा फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसला.
