मुंबईमधील टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल होत असतानाच रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ८६ टक्क्य़ांवर, तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी ८२ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी १,८३२ करोनबाधित आढळून आले, तर ३७ रुग्णांचा मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वी करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने मुंबईतील रुग्ण दुप्पटीच्या काळात घसरण झाली होती. तसेच रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणही घसरले होते. दरम्यानच्या काळात पालिकेने वाढविलेले चाचण्यांचे प्रमाण, बाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्णांचा घेतलेला शोध आदी विविध उपाययोजनांमुळे मुंबईतील रुग्ण दुप्पटीच्या काळात सुधारणा झाली आहे.

मुंबईतील करोनाबाधितांची संख्या दोन लाख ३८ हजार ५४८ वर पोहोचली आहे. शुक्रवारी १,६४४ रुग्ण करोनामुक्त झाल्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत दोन लाख पाच हजार १११ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

शुक्रवारी ३७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात २६ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश आहे. यापैकी ३३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत ९,६३५ करोनाबाधित मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, दुहेरी नोंदणी झालेले आणि मुंबई बाहेरील रुग्ण अशा सुमारे १,६२६ रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतून कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १९ हजार ६०८ इतकी आहे.

मुंबईत आतापर्यंत १३ लाख २५ हजार ५३७ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे मुंबईतील ९,९०५ इमारती टाळेबंद, तर ६४५ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात १,२६० नवे रुग्ण

* ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारी १ हजार ३२० करोनाबाधित आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या १ लाख ९८ हजार २६० इतकी झाली आहे. दिवसभरात ३२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, करोनाबळींची संख्या ५ हजार १५ वर पोहोचली आहे.

* शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील ३५२, नवी मुंबईतील ३४७, कल्याण-डोंबिवली शहरातील २०८, मीरा-भाईंदरमधील १३९, ठाणे ग्रामीणमधील ७४, अंबरनाथमधील ४३, भिवंडी शहरातील ३७, बदलापूरमधील ३० आणि उल्हासनगरमधील ३० रुग्णांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील ९, ठाणे शहरातील ६, मीरा-भाईंदरमधील ५, नवी मुंबईतील ५, ठाणे ग्रामीणमधील ३, अंबरनाथमधील २, भिवंडीतील १ आणि उल्हासनगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.