मुंबई….स्वागतिका असलेल्या १९ वर्षीय तरुणीचे बळबजरीने चुंबन घेताना सेल्फी काढून तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रकार अंधेरीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी १९ वर्षांची असून गोरेगाव येथे राहते. ती अंधेरी येथील एका खासगी कंपनीत स्वागतिका (रिसेप्शनिस्ट) म्हणून कामाला लागली.

मेट्रोने ती कंपनीत कामाला जात असते. या कंपनीच्या मालकाचा चालक कृष्णा शुक्ला उर्फ आशू याने तिच्याशी ओळख करून घेतली. दोघांनी एकमेकांच्या नंबरची देवाणघेवाण केली. आरोपी शुक्ला २५ एप्रिल रोजी तिला भेटला आणि घरी सोडतो असे सांगितले. गाडी पार्किंगमध्ये असल्याचे सांगून तिला इमारतीच्या पार्किंगमध्ये नेले. त्यावेळी आरोपी शुक्ला याने तिला प्रेमसंबंध ठेवण्याबाबत विचारले. मात्र पीडितेने त्याला नकार दिला. यावेळी आरोपी शुक्ला याने बळजबरीने तिचे चुंबन घेतले आणि त्याचा सेल्फी काढला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलीने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. मात्र भीतीपोटी ही बाब तिने कुणाला सांगितली नव्हती. दुसऱ्या दिवशी आरोपी शुक्ला तिला भेटला. होकार न दिल्यास चुंबन घेतलेले छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर सतत तो तिला धमकावून तिचा छळ करू लागला. त्यामुळे पीडित मुलगी तणावात होती. अखेर सोमवारी तिने याबाबत आईला माहिती दिली. अंबोली पोलिसांनी आरोपी कृष्णा शुक्ला याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५ (२) तसेच ७५ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.