मराठा मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन

मुंबईत पहिल्यांदाच होणारा मराठा क्रांती मूक मोर्चा शांतता व शिस्तीत पार पडावा यासाठी हजारो कार्यकर्ते पडद्यामागे राहून आपापली भूमिका वठवित आहेत. जवळपास वीस हजार स्वयंसेवकांनी या करिता नोंदणी केली आहे.

नोंदणीचे काम सकाळपासून दादर येथील शिवाजी मंदिरात सुरू होते. मराठा क्रांती मोर्चाचे संपर्क कार्यालय या ठिकाणी असल्यामुळे शिवाजी मंदिरला छावणीचे स्वरूप आले आहे. मुंबईतून अंदाजे सहा हजार, नवी मुंबईतून तीन हजार तर पुणे आणि कोल्हापूर येथून प्रत्येकी एक हजार कार्यकर्त्यांची स्वयंसेवक म्हणून ऑनलाईन नोंदणी केली आहे. याशिवाय उर्वरित महाराष्ट्रातून अंदाजे दहा हजार स्वयंसेवक मंगळवारी रात्री मुंबईत दाखल होतील, असे आयोजकांकडून सांगण्यात आले. मोर्चाच्या नियोजनासाठी २३ समित्या व उपसमित्या तयार करण्यात आल्या आहेत. आरोग्य, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, पार्किंग सुविधा अशा कामासाठी या समित्या कार्यरत असतील.

अनेक आमदारांनी मुंबईबाहेरून आलेल्या स्वयंसेवकांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. आमदार निवासातच स्वयंसेवकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.  शिवाय उस्मानाबादवरून आलेल्या स्वयंसेवकांसाठी नवी मुंबईतील तेरणा वैद्यकीय महाविद्यालय खुले करण्यात आले आहे. माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी देखील त्यांच्या एमजीएम महाविद्यालयात स्वयंसेवकाच्या राहण्याची सोय केली आहे. या शिवाय डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी न्याहारीची व्यवस्था करण्यात आली आहे.

लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. १०० रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथकही मोर्चादरम्यान कार्यरत राहणार आहे. पार्किगसोबतच वाहन दुरुस्ती पथकही कार्यरत असणार आहे.

टी-शर्ट, बॅच यांची जोरदार विक्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषवाक्य आणि मोर्चाचे बोधचिन्ह असलेल्या काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टची विक्री सुरु आहे. १२० रुपयांपर्यंत हे टी-शर्ट मुंबईच्या विविध भागात विकले जात आहेत. याशिवाय ‘मी मराठा’ नावाचे टॅटूही अनेक कार्यकर्त्यांनी हातावर काढून घेतले आहे. भगवे पटके, बॅच, पेन यांची मोठय़ा प्रमाणात विक्रीही भायखळा आणि दादर भागात सुरु  आहे. मोच्र्याच्या मार्गात लावण्यासाठी ८० हजार झेडय़ांची व्यवस्था आयोजकांनी केली आहे.