मुंबई : शिवसेना सोडल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंची दै. सामना कार्यालयासमोर सभा सुरू असताना घातलेल्या गोंधळाप्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर, सदा सरवणकर, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका केली.

साक्षीपुराव्यातील विसंगतीमुळे आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचे निरीक्षण खासदार, आमदारांशी संबंधित खटल्यांची सुनावणी घेणारे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी उपरोक्त निर्णय देताना नोंदवले. साक्षीदारांनी परस्परविरोधी साक्ष दिली. कोणताही वैद्यकीय पुरावा सादर केला गेला नाही. मालमत्तेचे नुकसान केले गेले याच्याशी संबंधित पुरावाही पोलिसांनी सादर केला नाही, असेही न्यायालयाने आरोपींची निर्दोष सुटका करताना नमूद केले.

हेही वाचा – कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती

हेही वाचा – मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

मतभेदांमुळे नारायण राणे यांनी १८ वर्षांपूर्वी शिवसेना सोडली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामना कार्यालयाबाहेर जाहीर सभा घेतली. परंतु, राणे यांच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी या सभेत गोंधळ घालण्याचा आणि सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे, पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागला. त्यावेळी, अनेकजण गंभीररित्या जखमी झाले. तेव्हा, शिवसेनेत असलेले शिंदे गटाचे सदा सरवणकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यासह ४८ नेते आणि अन्य आरोपींवर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.