मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबधित खटल्यातील मुख्य आरोपी भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी गुरुवारी विशेष न्यायालयासमोर अचानक उपस्थिती लावली. साध्वी यांना या प्रकरणी अटक करणाऱ्या राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्याची उलटतपासणी सुरू असताना साध्वी अचानक न्यायालयात हजर झाल्या.

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिवक्ता अविनाश रसाळ यांनी मंगळवारी या अधिकाऱ्याची सरतपासणी घेतली. त्यानंतर ठाकूर यांचे वकील जे. पी मिश्रा यांनी गुरुवारी अधिकाऱ्याची उलटतपासणी सुरू केली. ही उलटतपासणी सुरू असताना दुपारी १२ च्या सुमारास साध्वी न्यायालयात आल्या आणि आरोपींसाठी असलेल्या आसनावर जाऊन बसल्या. पाठदुखीचा त्रास जाणवत असल्याची तक्रार केल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी यांना बसण्यासाठी खुर्ची उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. साध्वी यांच्या विनंतीवरून न्यायालयाने न्यायालयाचे कामकाजही हिंदी भाषेतूनही चालवले.

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेला दोन लाख रुपये दंड ; २०१९ च्या आदेशासाठी विनाकारण पुनर्विलोकन याचिका केल्याची उच्च न्यायालयाची टिप्पणी

या एटीएस अधिकाऱयाने साध्वी यांच्यासह रमेश उपाध्याय, शिवनारायण कालसंग्रा आणि श्याम साहू यांनाही अटक केली होती. कालसंग्रा आणि साहू या दोघांनाही प्रकरणातून दोषमुक्त करण्यात आले आहे. याशिवाय या अधिकाऱ्याने गुजरातमधील पाच व्यक्तींचे जबाबही नोंदवले होते. त्यात बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेल्या साध्वी यांच्या दुचाकीचा वितरक आणि वित्त पुरवठादार यांचा समावेश होता. याच दुचाकीबाबत अधिकाऱयाने सुरत येथील आरटीओ अधिकाऱ्याचा जबाबही नोंदवला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकूर या न्यायालयात अभावानेच उपस्थिती असतात. सर्व आरोपींना हजर राहण्यासाठी न्यायालयाने आदेश दिले तरच त्या न्यायालयात उपस्थित राहतात. जानेवारीत त्या सुनावणीसाठी उपस्थित होत्या.