मुंबई : २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करून सुमारे अडीच लाख रुपये खंडणी उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरूणीच्या प्रियकर आणि त्याच्या मित्राविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

पीडित तरुणी २१ वर्षांची असून मूळची हरियाणामधील आहे. सध्या शिक्षणासाठी ती मुंबईत राहते. तिचे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना २० वर्षीय तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. त्यानंतर ते दोघे एकत्र (लिव्ह इन रिलेशनशीप) राहत होते. या काळात तिच्या प्रियकराने पीडित तरुणीची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती काढून ठेवल्या होत्या. दरम्यान, काही कारणांमुळे दोघांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. तरुणी त्याच्यापासून वेगळी झाली.

मित्राला छायाचित्रे दाखवून खंंडणीची योजना…

यानंतर तिच्या प्रियकराने पीडित तरुणीची अश्लील छायाचित्रे २२ वर्षीय मित्राला दाखवली. या अश्लील छायाचित्रांच्या आधारे दोघांनी तिला ब्लॅकमेल करायचे ठरवले. त्यानुसार प्रियकर आणि त्याच्या मित्राने पीडित तरुणीला धमकवायला सुरुवात केली. त्यांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही तर छायाचित्र सर्वत्र व्हायरल करण्याची धमकी त्यांनी दिली. घाबरून पीडित तरुणीने त्या दोघांना पैसे दिले. मात्र त्यांची मागणी वाढतच होती. १५ जानेवारी २०२५ ते १४ जुलै २०२५ या ६ महिन्यांच्या काळात हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरू होता. या सहा महिन्यांत तिने दोघांना २ लाख ४० हजार रुपये दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पीडितेच्या आईलाही धमकी

मुलगी सतत घरातून पैसे घेत असल्याने आईला संशय आला. सुरुवातील तरुणीने थातूरमातूर कारण देत सारवासारव केली. नंतर मात्र तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने तिच्या प्रियकराशी संपर्क साधला. आरोपींनी पीडित तरुणीच्या आईलाही धमकावले आणि आईवर बलात्कार करण्याची धमकी दिली.

विविध गुन्हे दाखल

याप्रकरणी पोलीस ठाण्यात १५ जुलै रोजी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) बलात्कार- कलम ६१ (१), खंडणी उकळणे- कलम ३०८ (२), गुन्हेगारी स्वरूपाची धमकी- कलम ३५१ ( ३), तसेच गुन्हेगारी कृत्याचा कट रचणे कलम ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियकराला अटक

मित्र फरार गुन्हा दाखल होताच पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी पीडित तरुणीच्या प्रियकराला अटक केली. त्याचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला असून तो तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकूण लागताच या प्रकरणातील दुसरा आरोपी फरार झाला. या प्रकरणी सध्या तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध घेत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.