मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मणिपूरमधील दंगलीत अडकलेले महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता विशेष विमानाने मुंबईत परतले. हे विद्यार्थी मणिपूरमध्ये अडकल्याचे समजल्यावर शिंदे आणि फडणवीस यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली होती.
मुख्यमंत्र्यांनी तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संपर्कही साधला होता. त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली होती. मुख्य सचिव मनोज सौनिक यांना मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले होते. या विद्यार्थ्यांना मणिपूर-इम्फाळहून आसाममध्ये गुवाहाटी येथे विशेष विमानाने सोमवारी सकाळी आणण्यात आले. त्यानंतर रात्री विशेष विमानाने या विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन झाले.
दिसताक्षणी गोळय़ा घालण्याचा आदेश दिल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले. वसतीगृहातून आम्हाला जेवण दिले जात होते, पण अन्नाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जेवण कधीपर्यंत मिळेल, याबाबत शंका होती. पिण्याचे पाणीही मिळत नव्हते.
– विकास शर्मा, भांडुप
मणिपूरमध्ये पेटलेल्या हिंसाचारामुळे जागोजागी परिस्थिती खूपच वाईट झाली होती. मात्र मणिपूरमधील शिवसेनेचे कार्यकर्ते महाविद्यालयात येऊन आम्हाला भेटले आणि आमच्यापर्यंत मदत पोहोचवली. त्यांनी आम्हाला त्या हिंसक भागातून सुखरूपपणे बाहेर काढून, एका खासगी हॉटेलमध्ये ठेवले. त्यानंतर विशेष विमानाने आम्हाला इम्फाळाहुन गुवाहाटी येथे आणि तिथून मुंबईत आणण्यात आले.