अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या निवडणुकीचा ज्वर यंदा भलताच चढला असून अनेक आरोप-प्रत्यारोपांनंतर आता या निवडणुकीची धिंड पोलीस दरबारी गेली आहे. या निवडणुकीतील तब्बल अडीच ते तीन हजार मतपत्रिका पोस्टातून गहाळ झाल्याची तक्रार ‘नटराज पॅनल’ने पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्याकडे दाखल केली आहे.
गहाळ झालेल्या मतपत्रिकांपैकी १२५० मतपत्रिका या जोगेश्वरी ते दहिसर या परिसरातील पोस्टातून हरवल्या आहेत. योगायोगाची गोष्ट म्हणजे या भागातील पोस्टाचे अधीक्षक रमेश कदम आणि उत्स्फूर्त पॅनलचे उमेदवार मोहन जोशी यांचे गेली चार वर्षे अत्यंत उत्तम मैत्रीचे संबंध आहेत.
निवडणुक अधिकाऱ्यांनी मुंबई विभागाच्या ६०४९ मतपत्रिका पोस्टात टाकल्या. त्यापैकी ७२ पत्रिका चुकीचा पत्ता किंवा पत्ता नीट न लिहिल्याने परत आल्या. मात्र उर्वरित ५९७७ पत्रिकांपैकी प्रभादेवी-दादर-माहीम विभागातील १००० आणि मालाड-दहिसर परिसरातील १५०० अशा तब्बल अडीच हजार मतपत्रिका इच्छुक पत्त्यांवर पोहोचल्याच नाहीत. ही बाब लक्षात आल्यानंतर विनय आपटे यांच्या ‘नटराज पॅनल’ने प्रथम माहीम पोस्टात आणि नंतर जीपीओमध्ये तक्रार दाखल केली. याबाबत पोस्टाची चौकशी चालू आहे.
मात्र पोस्ट खात्याकडून काहीच उत्तर न मिळाल्याने विनय आपटे, अशोक हांडे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रभाकर (गोटय़ा सावंत) आदींनी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांच्याकडे गुरुवारी तक्रार दाखल केली.
विशेष म्हणजे जोगेश्वरी ते दहिसर परिसरातील पोस्टाचे अधीक्षक रमेश कदम यांचे मोहन जोशी यांच्याशी मैत्रिपूर्ण संबंध आहेत, अशी माहिती पोस्टातील सूत्रांकडूनच मिळते. तसेच बुधवारी मोहन जोशी यांच्या ‘उत्स्फूर्त पॅनल’मधील उमेदवार सुशांत शेलार याने २३० मतपत्रिका एकगठ्ठा नाटय़परिषदेच्या कार्यालयातील पेटीत टाकल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
याबाबत रमेश कदम यांच्याशी संपर्क साधला असता, मोहन जोशी आणि आपले मैत्रिपूर्ण संबंध असले, तरी त्याचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच या मतपत्रिकांची नोंद कुठेच होत नाही. त्यामुळे त्या गहाळ झाल्या असतील, असेही ते म्हणाले.