नितीन गडकरी यांची घोषणा;दोन नदीजोड प्रकल्पांचे नव्याने करार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत २६ सिंचन प्रकल्पांना एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन ते लवकरच पूर्ण केले जातील व पाच लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असे केंद्रीय भूपृष्ठवाहतूक व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे केले. नदीजोड प्रकल्पाअंतर्गत गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यातील पार-तापी-नर्मदा आणि दमण-पिंजाळ हे आंतरराज्य नदी करार नव्याने केले जातील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्राला ५० टीएमसी पाणी अधिक उपलब्ध होणार आहे. राज्याची सिंचन क्षमता ४० टक्क्य़ांपर्यंत नेण्यासाठी विविध योजना राबविण्याची सूचनाही गडकरी यांनी केली.

राज्यातील जलसंपदा प्रकल्प आणि राष्ट्रीय महामार्गावरील विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानी बैठक पार पडली. सर्व जिल्हाधिकारीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

नदीजोड प्रकल्पांतर्गत गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यातील पार-तापी-नर्मदा आणि दमन-पिंजाळ या आंतरराज्यीय नद्यांच्या पाणीवाटपाबाबत २०१० चा करार मोडीत काढून नवीन करार करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्याला ५० टीएमसी पाणी जादा मिळून सिंचन क्षमता वाढेल. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राला त्याचा फायदा होऊन महाराष्ट्राचे चित्र बदलेल, असे गडकरी यांनी सांगितले. मध्य प्रदेश येथील चौराई धरणाचे पाणी राज्याला मिळावे, यासाठीही दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नवीन करार केला जाईल.

यंदा कमी पाऊस झाल्याने पेंच प्रकल्पातील तोतलाडोह, नवेगाव खैरी आणि खिंडसी तलाव येथील पाणीसाठा कमी झाला आहे. या करारामुळे विदर्भातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील १० हजार कोटी रुपयांचे सिंचन प्रकल्प येत्या दोन वर्षांत मार्गी लागतील, असेही गडकरी यांनी सांगितले.

रस्त्यांची कामे त्वरित सुरू करा-मुख्यमंत्री

राष्ट्रीय महामार्गावरच्या विविध प्रकल्पांची व जिल्ह्य़ांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे त्वरित सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. नागपूर रिंग रस्ता, पार्डी उड्डाणपूल, पुणे-सातारा रस्ता, खेड-सिन्नर, जेएनपीटी रस्ता, पनवेल-इंदापूर चौपदरी रस्ता, सोलापूर-कर्नाटक बॉर्डर रस्ता, सोलापूर-येडशी, येडशी-औरंगाबाद, अमरावती-चिखली, तुळजापूर-औसा, औसा-चाकूर, लातूर बायपास रस्ता, चाकूर-लोहा, लोहा-वारंगा, वारंगा-महागाव-यवतमाळ रस्ता, यवतमाळ-वर्धा, नांदेड-हिंगोली-वाशीम-अकोला मार्ग, गोंडखैरी-कळमेश्वर-ढेपेवाडा-सावनेर रस्ता, फगणे-गुजरात-महाराष्ट्र बॉर्डर रस्ता, वणी-वरोरा, औरंगाबाद-धुळे, मुंबई-गोवा महामार्ग, नाशिक-सिन्नर, मुंबई-वडोदरा महामार्ग, कल्याण-निर्मल-नांदेड या रस्त्यांच्या कामांच्या प्रगतीचा आढावा गडकरी व फडणवीस यांनी  घेतला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 26 irrigation projects completed soon says nitin gadkari
First published on: 09-09-2017 at 05:13 IST