वर्षभरात २६१४ बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई: अनियमित व असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, तंबाखू सेवन, अपुरी झोप, मानसिक व शारीरिक तणाव, कुपोषण आदी अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात तरुणाईच्या उंबरठय़ावरच हृदयाचे आरोग्य बिघडत चालले आहे. गंभीर बाब म्हणजे, सहा वर्षांखालील बालकांमध्येही हृदयविकार बळावत चालल्याचे राज्याच्या आरोग्य खात्याने केलेल्या पाहणीत निष्पन्न झाले असून वेळीच केलेल्या हृदय शस्त्रक्रियांमुळे हजारो बालकांवरील संकटाचे सावट दूर झाले आहे.

हृदयविकाराच्या वाढत्या समस्येची गंभीर दखल घेऊन आरोग्य विभागाने बालकांच्या आरोग्य तपासणीच्या मोहिमा राबवून जन्मजात हृदयविकार असलेल्या बालकांचा शोध घेतला. गेल्या वर्षभरातच, हृदयविकाराचा त्रास असलेली ३४९४ बालके राज्यात आढळून आली. त्यापैकी २६१४ बालकांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया केल्याने त्यांचे प्राण वाचले असले, तरी आता तरुणाईबरोबरच बालकांचे विश्वदेखील हृदयविकाराच्या विळख्यात अडकल्याची भीती वाढीस लागली आहे.

राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची अंमलबजावणी २०१३ पासून करण्यात आली. या योजनेत आरोग्य विभागाकडून नवजात बालकांपासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आरोग्याची सर्वागीण तपासणी व आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात. अंगणवाडी स्तरावर सहा वर्षांपर्यंतच्या बालकांची आरोग्य तसेच कुपोषण तपासणीही केली जाते. सहा ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांची तपासणी आश्रमशाळा, शासकीय, निमशासकीय शाळांमधून केली जाते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गतची ही मोहीम राबविण्यात येते.

२०१८-१९ मध्ये शालेय तपासणी अंतर्गत एक कोटी २१ लाख २४ हजार ४२८ बालकांची तपासणी करण्यात आली असून हे प्रमाण एकूण विद्यार्थ्यांच्या ९५ टक्के इतके आहे.

याशिवाय अंगणवाडय़ांमध्ये ० ते ६ वयोगटातील ६७ लाख ७१ हजार २६७ एवढय़ा बालकांची तपासणी करून कुपोषित तसेच जन्मजात व्यंग असलेल्या बालकांसह हृदयविकाराचा त्रास असल्या बालकांची नोंद करण्यात आली. वेगवेगळ्या आजारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या ९२४९ बालकांचा यामध्ये समावेश होता. त्यापैकी ८०३० बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात हृदयविकाराचा त्रास असलेल्या २६१४ बालकांचा समावेश असल्याचे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.

जन्मजात हृदयविकाराचा त्रास असलेल्या बालकांचा शोध घेतला असता, बहुसंख्य बालकांच्या हृदयात छिद्र असल्याचे आढळून आले तर काही बालकांच्या हृदयातील झडपांमध्ये दोष आढळून आले. ‘इंडियन असोसिएशन ऑफ पेडियॅट्रिक सर्जरी’ संस्थेतील डॉक्टरांच्या सहकार्याने या हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून आरोग्य विभागाने या शस्त्रक्रियांच्या खर्चाची जबाबदारी उचलली. जानेवारी २०२० अखेरीस १८६४ मुलांवर यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या असून आगामी काळात अधिक बारवाईने व अत्याधुनिक तंत्राच्या माध्यमातून बालकांच्या आरोग्याची तपासणी केली जाईल, असे डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.

*   सर्वाधिक हृदयशस्त्रक्रिया या सोलापूरमधील असून तेथील २८५ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या पाठोपाठ पुणे २७०, नाशिक २३९, अहमदनगर १७६, ठाणे १३०,पालघर १३४, सातारा १२०, रत्नागिरी १०५, उस्मानाबाद ११२, नांदेड १५५ तर बीड १२८ अशा बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

*    हृदयविकाराच्या शोधण्यात आलेल्या एकूण ३४९४ बालकांपैकी २६१४ बालकांच्या शस्त्रक्रिया पार पडल्या असून काहींच्या पालकांनी स्थलांतर केले तर काहींचे पालक शस्त्रक्रिया करण्यास राजी नसल्यामुळे त्यांच्या शस्त्रक्रिया होऊ शकल्या नाहीत, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

भावी पिढी आजारग्रस्त!

जवळपास प्रत्येक राज्यातच किशोरवयीन मुलांच्या आरोग्याच्या समस्या उग्र झाल्या असून मधुमेह व हृदयविकारासारख्या आजारांनी अनेकांना ग्रासले आहे, असे ‘नीती आयोगा’च्या नोव्हेंबर २०१९ च्या आरोग्यविषयक अहवालात म्हटले आहे. १० ते १९ वयोगटातील देशातील सुमारे २४.३० कोटी किशोरवयीन मुलांपैकी जवळपास निम्मी मुले कृष, खुज्या उंचीची, बोजड वजनाची किंवा स्थूल असून पोषक आहाराच्या अभावामुळे मधुमेह, हृदयविकारासारखे आजार बळावत असल्याची चिंताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. आजची बालके हे देशाचे भविष्य असल्याने या समस्येवर वेळीच उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असेही या अहवालात म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2614 children life saved after successful heart surgery in 2019 zws
First published on: 21-02-2020 at 04:16 IST