आधी महापालिका नको आणि आता जिल्हा परिषद नको अशी भूमिका घेणाऱ्या कल्याण-डोंबिवली परिसरातील २७ गावांचा आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा याच महापालिकेत समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रस्तावास मान्यता दिली असून, याच आठवडय़ात याची अधिसूचना काढली जाईल, अशी माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने २००१ मध्ये घेतला होता. महापालिका सुविधा देत नाही, मात्र भरमसाट कर गोळा केले जातात असा आरोप करीत संघर्ष समितीने केलेल्या आंदोलनांसमोर झुकत तत्कालीन सरकारने ही २७ गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गेल्या १३ वर्षांत या गावांवर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे मोठय़ा प्रमाणात इमारती, अतिक्रमणे उभी राहिली. एवढेच नव्हे तर आलिशान गृहसंकुलेही उभी राहिली असून, मुंबईतील अनेक बडय़ा बिल्डरांनीही त्याच गावात कवडीमोल दराने जमिनी विकत घेतल्या. अर्निबध नागरीकरणामुळे या २७ गावांमध्ये पायाभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे आता आम्हाला जिल्हा परिषद नको, अशी भूमिका या भागातील नागरिकांनी घेतली असून, पुन्हा महापालिकेत घ्या अशी मागणी सुरू केली आहे. त्यातच लवकरच या महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून, त्यात राजकीय लाभ मिळविण्याच्या दृष्टीने या गावांचा सुनियोजित विकास करण्याच्या नावाखाली गावांचा पुन्हा महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कल्याण महापालिकेतून वगळलेली २७ गावे तसेच ठाणे महापलिकेतून वगळण्यात आलेल्या १५ आणि नवी मुंबईतून वगळण्यात आलेल्या १४ गावांची मिळून आणखी एक महापालिका करावी किंवा या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका कराव्यात, असा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने नगरविकास विभागास पाठविला होता. मात्र नवी महापालिका स्थापन करणे आर्थिकदृष्टय़ा अवघड असल्याचा निष्कर्ष नगरविकास विभागाने काढल्यानंतर ही २७ गावेच महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यास मुख्यमंत्र्यांनीही मान्यता दिली आहे. लवकरच याबाबतची अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेत समावेश केलेली गावे
घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, मणेरे, वसार, आशेळ, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, सोनारपाडा, माणगाव, कोळे, निळजे, काटई, उसरघर, घारीवली, संदप, भोपर, नांदिवली पंचानंद, आसदे, सागाव, देसलेपाडा.

