मुंबईच्या कमला मिल परिसरातील आग दुर्घटनेप्रकरणी शनिवारी रात्री आणखी तीन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्यासह कमला मिलचे संचालक भंडारी आणि निर्वाण या हुक्का कंपनीचा मालक पांडे यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमला मिल कम्पाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस ब्रिस्टो या पबमध्ये २९ डिसेंबर रोजी आग लागली होती. या आगीप्रकरणी दोन्ही पबच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात आतापर्यंत सहाजणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ‘वन अबव्ह’चे तीन मालक अभिजित मानकर, क्रिपेश आणि जिगर सिंघवी आणि मोजो बिस्ट्रोचे मालक युग तुली आणि युग पाठक यांचा समावेश आहे.

२९ डिसेंबर २०१७ रोजी रात्री वन अबव्ह या पबमध्ये आग लागली. ही आग शेजारीच असलेल्या मोजो बिस्ट्रो या रेस्तराँमध्येही पसरत गेली असा अंदाज सुरुवातीला वर्तवण्यात आला होता. मात्र अग्निशमन दलाने मुंबई महापालिकेला दिलेल्या माहितीनुसार मोजो बिस्ट्रो या रेस्तराँमध्ये आधी आग लागल्याचा दावा करण्यात आला होता. या दोन्ही रेस्टोपबच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोजो बिस्ट्रो रेस्तराँच्या दक्षिण पूर्व भागात आगीची तीव्रता जास्त होती. तेथील जमिनीवरील लाद्यांचेही आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पडद्यांनी पेट घेतला आणि त्यानंतर आग छतापर्यंत पोहोचली. दक्षिण बाजूला आग पसरवणाऱ्या वस्तू नव्हत्या. मात्र, छतावाटे आग सर्वत्र पसरली. ‘मोजो’च्या गच्चीमध्ये छप्पर नसलेल्या ठिकाणी बार होता. येथेच बार टेण्डरकडून आगीचे खेळ सुरू होते. मात्र, ही जागा आगीने पेट घेतलेल्या पडद्यापासून दूर होती, असे अग्निशमन दलाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 more arrest in kamla mill fire case
First published on: 20-01-2018 at 22:44 IST