मुंबई : विविध लोकप्रिय घोषणांची अंमलबजावणी करताना राज्याच्या तिजोरीवर येणारा भार कमी करण्यासाठी सरकारने ४१ मद्यनिर्मिती उद्योगांना प्रत्येकी आठ असे ३२८ नवे परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यातील ९६ परवाने (सुमारे ३० टक्के) हे राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांशी संबंधितांच्याच झोळीत पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सर्वाधिक परवाने हे भाजप नेत्यांच्या संबंधितांना मिळणार असून त्याखालोखाल दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे निकटवर्तीही याचे ‘लाभार्थी’ ठरणार आहेत. उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्कमंत्री अजित पवार यांनी राज्याचा महसूल वाढविण्याच्या उद्देशाने मद्यविक्री दुकानांची संख्या वाढवण्यासाठी नवे धोरण आणले आहे. त्याअंतर्गत ३२८ मद्यविक्री दुकानांचे (वाइन शॉप) परवाने देण्याचे नियोजन आहे.
सध्या राज्यात विदेशी मद्यविक्रीची १७१३ दुकाने आहेत. लोकक्षोभामुळे १९७४पासून नवे परवाने देणे बंद आहे. परिणामी, ९०० व्यावसायिकांचीच मद्यविक्रीत मक्तेदारी आहे. राज्यातील १०८ तालुक्यांमध्ये मद्यविक्रीचे एकही दुकान नाही. मात्र आता महसूलवाढीसाठी मद्यविक्री दुकानांची संख्या वाढवण्याचा निर्णय पवार यांनी घेतला आहे. मात्र परवाने खुले न करता ४१ मद्यनिर्मिती उद्योगांना प्रत्येकी ८, असे ३२८ परवाने दिले जातील. यापैकी ९६ परवाने राजकीय नेत्यांच्या घरात जाणार असल्याचे उघड झाले आहे.
भाजपशी संबंधित पाच नेत्यांशी संबंधितांच्या कंपन्यांना एकूण ४० परवाने मिळणार आहेत. यात माजी मंत्री दिवंगत डॉ. बळीराम हिरे यांचे पुत्र प्रसाद हिरे यांची ‘डेल्टा डिस्टिलरीज’; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे पुत्र आर्यमन चारुदत्त पालवे यांची ‘रॅडीको एन.व्ही. डिस्टिलरीज’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र सारंग गडकरी संचालक असलेली ‘मानस ॲग्रो इंडस्ट्रीज’; ‘कराड दक्षिण’चे भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याशी संबंधित ‘यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना’ व दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांचे पुतणे महेश देशमुख संचालक असलेली ‘लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज’ यांचा समावेश आहे. अजित पवार गटाचे माजी आमदार संजयमामा शिंदे संचालक असलेली ‘विट्ठल कार्पोरेशन’; मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे व्यावसायिक भागीदार संचालक असलेली ‘नक्षत्र डिस्टिलरीज अँड ब्रुवरीज’ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या सदानंद बापट यांच्या ‘ॲडलर्स बायो एनर्जी’ आणि ‘असोसिएटेड ब्लेंडर्स’या कंपन्याना परवाने मिळतील. तर शरद पवार गटामधील इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील अध्यक्ष असलेला ‘राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना’; शिराळ्याचे माजी आमदार मानसिंग नाईक यांची पत्नी, पुत्र व कन्या संचालक असलेली ‘विराज अल्कोहोल्स’ व पक्षाच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा सोनिया होळकर यांचे पती सत्यजित होळकर संचालक असलेली ‘ग्रेनॉच इंडस्ट्रीज’ या कंपन्यांना पनवान्यांचा लाभ मिळणार आहे. नव्याने परवाने मिळणार असलेल्या ४१पैकी १६ कारखाने बंद असून काहींनी केवळ परवान्यांच्या लाभासाठी नावापुरते कारखाने सुरू ठेवले आहेत. या सर्वांच्याच वाट्याला नवे परवाने येणार आहेत. हे नवे परवाने एक कोटी रुपयांमध्ये मिळणार असून ते भाडेकरारावर देण्याचीही असल्याने मद्य उद्योजकांना मोठा आर्थिक लाभ होणार असल्याची चर्चा आहे.
कुणाकडे किती परवाने?
पक्ष । नेते । परवाने
भाजप । ५ । ४०
राष्ट्रवादी (अप) । ४ । ३२
राष्ट्रवादी (शप) । ३ । २४
मद्यविक्री परवान्यांची मागणी आमच्या कंपनीने केलेली नाही. मी संचालक असलेली कंपनी वाइन शॉप व्यवसायामध्ये नाही. – सारंग नितीन गडकरी, संचालक, मानस ॲग्रो इंडस्ट्रीज
जय अजित पवार यांच्या ‘कॅपोव्हिटझ इंडस्ट्रीज’मध्ये मी भागीदार असलो तरी माझ्या ‘असोसिएटेड ब्लेंडर्स व ॲडलर्स बायो’ या कंपन्यांचा आणि जय पवारांचा संबंध नाही. – सदानंद दत्तात्रय बापट, मद्य उद्योजक, पुणे
प्रतीक जयंत पाटील, पंकजा मुंडे आणि अतुल भोसले यांच्याशी अनेकदा संपर्क साधल्यानंतरही त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
नव्या ३२८ परवान्यांमुळे परप्रांतीयांची मद्यविक्री व्यवसायामधील तब्बल ५० वर्षांची मक्तेदारी संपुष्टात येणार आहे. – मानसिंग नाईक, माजी आमदार व संस्थापक, विराज अल्कोहोल्स
आमदार- खासदारांच्या कुटुंबीयांनी उद्योग स्थापण्यात काही गैर नाही. लोकप्रतिनिधी आणि व्यवसाय या भिन्न बाबी आहेत. – सुभाष देशमुख, भाजप आमदार व संस्थापक, लोकमंगल माउली इंडस्ट्रीज